राजुरा: राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून ही निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनानी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे.राजुरा तालुक्यातील चार्ली, चिंचोली (खु.), चुनाळा, गोवरी, कठोली (बु.), कविठपेठ, मुठरा, पेल्लोरा, विहिरगाव, वरोडा, बामनवाडा, चंदनवाही, चिचोली (बु.), कोहपरा, कोलगाव, मूर्ती, पंचाळा, पवनी, सातरी, चनाखा, धानोरा, कळमना, खामोना, मारडा, नलफडी, सिंधी, सुमठाना, धिडसी या २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंत्यत चुरशीच्या होणार असून प्रत्येक गावामध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना सक्रीय आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षासोबत युती करणार यावर पुढील चित्र दिसणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अॅड. संजय धोटे यांना आपल्या कामाचा वेग वाढवून त्यांना नव्याने जोडणी करुन आपल्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपाची टक्कर काँग्रेस, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे.काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुकीची मोर्चेबांधणी केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी व्युहरचना आखणे सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागल्यामुळे माजी आमदार सुभाष धोटे या निवडणुकीत कुठलीही जोखीम न घेता निवडणुक जिंकायची यासाठी सज्ज झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेलासुद्धा कमी लेखता येणार नाही. शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप सातत्याने मतदाराच्या संपर्कात असून ते कधीही थकताना दिसत नाही. इच्छुक उमेदवारांची त्यांनी पडताळणी सुरू केली असून उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे याची भूमिकासुद्धा निर्णायक राहणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हेदेखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून कार्यक्रम आखणीत ते तरबेज आहेत. ते स्वत: नियोजन करीत असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी तेदेखील सज्ज दिसत आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वांनीच त्या गांभीर्याने घेतल्या आहेत. पुन्हा एकदा मतदाराच्या दारात मत मागणीसाठी नेते मंडळी आश्वासनाच्या खैराती घेऊन येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
राजकीय आखाड्यासाठी राजकीय नेते सज्ज!
By admin | Published: July 10, 2015 1:33 AM