चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा नूतनीकरण लोकार्पण सोहळ्यात प्रोटोकाॅलच्या एका चुकीने अभूतपूर्व गोंधळ झाला. माजी अर्थमंत्री आमदारसुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) हे आमने-सामने आले. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांनी हातात माईक घेऊन झालेल्या चुकीवर धमक्यांचा पाऊस पाडला. हा सारा प्रकार चंद्रपूरकर जनता खुर्च्यावर न बसता उभे राहून बघत होती. हा राजकीय गोंधळ शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत चालला.
महापालिकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र पत्रिकेत पालकमंत्री, खासदार व स्थानिक आमदारांचे नावच टाकले नव्हते. ही बाब उघड होताच या कार्यक्रमावर टीका व्हायला सुरुवात झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांत गतीने ही प्रोटोकाॅलचे पालन न झालेली पत्रिका व्हायरल केली. त्या विरोधात प्रसिद्धीपत्रकेही काढली. ही चूक महापालिकेच्या लक्षात येताच तातडीने पुन्हा प्रोटोकाॅल विचारात घेऊन पत्रिका छापल्या आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ज्यांनी नावे सुटली, त्या नेत्यांपर्यंत पोहोचविल्या. दरम्यान, आमदार जोरगेवार यांनी शहरात ‘मी येणारच आहे’ अशा आशयाचे फलक लावून व्हिडिओही शेअर केले. यावरून या कार्यक्रमांत गोंधळ होण्याची चर्चा शहरात रंगू लागली.
कार्यक्रमाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी उपस्थितांमध्ये उत्सुकता ताणली जात होती. सायंकाळी सुमारे सात वाजता माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्रमस्थळी पोहोचले. काही क्षणांतच खासदार बाळू धानोरकर हेही पोहोचले. यानंतर बगीचा लोकार्पणाचा कार्यक्रम आटोपला. काही वेळातच रॅलीच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमस्थळी पोहचले. यानंतर त्यांचे कार्यकर्ते किशोरभाऊ आगे बढोच्या घोषणा देत होते. यानंतर भाजपचे कार्यकर्तेही सुधीरभाऊ आगे बढोच्या घोषणा देत होते. अशा घोषणांमध्येच तीनही नेत्यांनी बागेला फेरफटका मारला.
दरम्यान, खासदार बाळू धानोरकर निघून गेले आणि किशोर जोरगेवार हे व्यासपीठासमोर आले; तर आमदार सुधीर मुनगंटीवार हे बगीच्यातील केलेल्या कामांची पाहणी करीत होते. काही वेळाने आमदार मुनगंटीवार हेही व्यासपीठावर आले. यानंतर व्यासपीठावर चढताच आमदार जोरगेवार यांनी हातात माईक घेऊन भाषणाला सुरुवात केली. त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यक्रम रीतसर, प्रोटोकाॅलनुसार होऊ द्या, अशी विनंती करताच आमदार जोरगेवार यांनी ‘तुम्ही आम्हाला प्रोटोकाॅलच्या गोष्टी तुम्ही सांगू नका,’ अशा शब्दांत उत्तर दिले. यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.
दुसरीकडे असलेला माईक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हातात घेतला. ते म्हणाले, हा महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे. प्रत्येकांनी सभ्यतेने राहावे. बदनाम करायचे नाही. आम्ही सर्व गोष्टींनी तयार असल्याचे आव्हान दिले. कार्यक्रमात सत्कार आहे. कार्यक्रमात मध्यातच उभे राहून असे काही केले तर त्याचा अंत अतिशय वाईट आहे. यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.
दरम्यान, मनपा पदाधिकाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांना समजाविण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. यानंतर आमदार जोरगेवार यांनी माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज येत नव्हता. अखेर ते कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रमातून निघून गेले. यानंतर पुन्हा आमदार मुनगंटीवार यांनी माईक हातात घेऊन जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याठिकाणी मुद्दाम गालबोट लागावे हे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हा गोंधळ आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रेरणेने - मुनगंटीवार
ममहापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी ही आग लावण्याचा कार्यक्रम केला. त्यांनी आज आग लावली आहे. पण ही आग विझविण्याचे काम मी करणार आहे. माझ्या आडनावात सुधीर आहे. त्यांला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. याच आझाद बगीच्यातून आम्ही सांगतो आहे, ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील. आयुक्तांनी सुरुवात केली आहे. आयुक्तांनी काडी टाकली आहे. हा बांबूचा भाग आहे. असे बांबू दाखवू, आता फक्त लढाई पाहायची, अशा शब्दात गंभीर इशारा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
एका प्रोटोकाॅलने राजकीय वातावरण दूषित
महानगर पालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मनपाला कोणतेही शासकीय कार्यक्रम घ्यायचे असल्यास शासकीय शिष्टाचार (प्रोटोकाॅल) पाळावा लागतो. आझाद बगिच्याचे नूतणीकरण करण्यात आले. याचे लोकार्पण करताना मनपाने हा प्रोटोकाॅल पाळणे अनिवार्य होते. ही जबाबदारी शासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून आयुक्तांची होती. या एका चुकीमुळे चंद्रपुरात पहिल्यांदाच दोन नेते आवेशात आले. ही बाब चंद्रपुरात राजकीय वातावरण दूषित करणारी नक्कीच आहे, अशा प्रतिक्रिया या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तासनतास वाट बघत असलेल्या चंद्रपूरकर जनतेच्या होत्या.