पक्षप्रवेश बॅनर बाजीला ऊत - नेत्यांचे वाढदिवस ही जोमात
वेदांत मेहरकुळे
गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. तालुक्यात रुग्णांची संख्याही घटली आहे. यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार, असे संकेत मिळताच तालुक्यात नेत्यांचे वाढदिवस, पक्षप्रवेश आणि बॅनरबाजीला ऊत आला आहे. तालुका स्तरावरील राजकारण पेटल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या गोंडपिपरी तालुक्याचे विधानसभेचे प्रतिनिधित्व भाजपाकडे जाताच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केले. तत्पूर्वी नव्या चेहऱ्यांचा भाजपात प्रवेश करून सत्ता नसतानाही पक्ष जिवंत ठेवणारे माजी जि. प. उपाध्यक्ष संदीप करपे हे मात्र भाजपाच्या सक्रिय राजकारणातून दूर सारले गेले. करपे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेचा धनुष्य पेलला. उपजिल्हाप्रमुख पद घेतले. त्यांच्यापाठोपाठ अनेक तरुणांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध भाजपा असे समीकरण असताना स्थानिक पातळीवर शिवसेना मोठे आव्हान उभे करण्याचे संकेत आहे.
काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांचे धाकटे बंधू महेंद्र सिंग चंदेल यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास आघाडी तयार करून प्रभागाची चाचपणी करत स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील विधानसभेच्या दृष्टिकोनातून महेंद्रसिंग चंदेल यांनी राजकीय खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबईस्तरावर फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यासाठी पहिले गावात सत्ता यावी, हा त्यांच्या खेळीमागील डाव असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, हे गृहीत धरून पक्षप्रवेश, नेत्यांचे वाढदिवस व शहर व तालुक्यात बॅनरबाजी, भेटीगाठी व विविध प्रभागातील उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. नगरपंचायतपूर्वी गोंडपिपरी ग्रामपंचायतीमध्ये सलग तीनदा सत्ता बसविण्यात किंगमेकर ठरलेले खेमचंद गरपल्लीवार हेही पुन्हा सक्रिय झाले आहेत. सर्वात जुन्या धामणपेठ आदिवासी जंगल कामगार सोसायटीमध्ये मोठा उलटफेर करून तत्कालीन अध्यक्ष व सचिवावर अविश्वास आणला. यासाठी सभासदांचा विश्वास जिंकत मोठा धमाका केला. या सर्व राजकीय घडामोडी बघता नगरपंचायतीसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक नेतेमंडळी कामाला लागली आहे.
140821\images (6).jpeg
निवडणूक फोटो संग्रहीत छायाचित्र