आशिष देरकर कोरपनाचंद्रपूर जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ९ जुलैला मतदान होणार असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.३ जूनच्या रात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू झाली असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते व उमेदवार कामी लागले आहे. येत्या ८ जूनला निवडणुकीची नोटीस प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे. २० जून २३ जून या दरम्यान, उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहे. २४ जूनला अर्जांची छाननी होणार असून २८ जूनला नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. २८ तारखेलाच दुपारी ३ वाजतानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप होणार आहे. ९ जुलैला मतदान होणार असून ११ जुलैला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहते. १२ जुलैला निवडणूक निकालाची अंतिम यादी प्रकाशित होणार आहे.राज्यातील एकूण ९२ ग्रामपंचायतीपैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार असल्याने पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणात चुरस निर्माण होणार असून कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, शेतकरी संघटना अशा अनेक पक्षांमध्ये कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत दिसणार आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असला तरी राजुरा विधानसभा क्षेत्रात खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना यांच्यातच होणार आहे. कारण राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात अजुनही भाजपची ताकद वाढली नाही. राजुरा विधानसभा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपचे आ.संजय धोटे, कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा झेंडा पकडून आहेत. मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ९ जुलैला मतदान
By admin | Published: June 08, 2016 12:43 AM