ऑटो व्यावसायिकांना हवा आधार
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न सध्या ऑटोचालकांना पडला आहे. शासनाने कोरोना संकट काळामध्ये आर्थिक मदतीची घोषणा केली होती; मात्र नोंदनिक ऑटोचालकांना ती मिळाली; मात्र उर्वरित आटोचालकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गंजवार्डात स्वच्छतेकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागात स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा
चंद्रपूर :स्थानिक जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकापर्यंत अनेकांनी फुटपाथवर अतिक्रमण केल्याने पायदळ जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत काहींनी पालिकेकडे तक्रार केली आहे; मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करावे, अशी मागणी केली जात आहे.
नगिनाबागमध्ये समस्या वाढल्या
चंद्रपूर : नगिनाबाग वॉर्डात दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. सुसज्ज रस्ते, नाल्यांचा प्रश्न अजूनही निकाली न लागल्यामुळे नागरिकांध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. जागोजागी पाणी साचून रहात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी नागरिकांना विकास कामे करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते हवेतच विरल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.