मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : स्थानिक नगिनाबाग प्रभागात भटक्या श्वानांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला असून, याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या श्वानांनी काही दिवसांपूर्वी हल्ले करून मुलांना जखमी केले आहे. या घटना वाढत असून, श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक कृषिपंपाना वीजजोडणी न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. केवळ निविदा न निघाल्याच्या नावाखाली महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची बोळवण करत आहेत. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.
माजरी - कोंढा मार्गावर धुळीचे साम्राज्य
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होते. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचून राहतो. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
चिल्लरच्या तुटवडयामुळे नागरिक त्रस्त
कोरपना : सध्या देवाण-घेवाणातील व्यवहारात चिल्लरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकांसह ग्राहकही हैराण झाले आहेत. किराणा दुकान, भाजीपाला, पान टपऱ्यांमध्ये नागरिकांना सुट्ट्या पैशांसाठी झगडावे लागत आहे. व्यवहाराच्या दृष्टीने सुट्टे पैसे गरजेचे आहेत. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही चिल्लरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
दुर्गापुरात अपघाताची शक्यता वाढली
दुर्गापूर : दुर्गापूर - ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर - ताडोबा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा मार्ग ओलांडून जाताना वळन घेत ये-जा करावे लागते. हे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघातही या रस्त्यावर झाले आहेत.
खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. त्यातच कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने बहुतांश जनता शेतीवरच आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यामुळे तालुक्यात त्वरित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाचनालयात गर्दी वाढली
चंद्रपूर : लाॅकडाऊननंतर वाचनालये सुरु झाली आहेत. शहरातील वाचनालये गर्दीने फुलली आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असल्याने विद्यार्थी तेथेच राहून आयपीएस, पीएसआय, एसटीआय, एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र, शासकीय नोकरभरती होत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे.