आॅनलाईन लोकमतघोसरी : उन्हाच्या दाहकतेने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून पाणी टंचाईची तीव्रता सर्वत्र जाणवू लागली आहे. असे असताना केवळ तुरूम बांधकाम सुरू करण्याकरिता कंत्राटदाराने चक्क मालगुजारी तलावाचे पाणी सोडले. ऐन उन्हाळ्यात तलावातील पाणी वाहून जात असल्याने पुढे नागरिकांना व जनावरांनाही पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पोंभुर्णा तालुक्यातील माजी मालगुजारी तलावाचे तुरूम व वेस्ट वेअरचे बांधकाम कंत्राटदारांमार्फत केले जात आहे. मौजा - फुटाणा व लालहेटी या मामा तलावामध्ये पाण्याचा सध्या चांगला साठा आहे. त्यामुळे मे - जून महिन्यापर्यंत गुरांना तृष्णातृप्ती व महिलाना कपडे धुण्यासाठी सोईचे होईल.तालुक्यात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना कंत्राटदाराने आततायीपणा दाखवून तुरुम बांधकामाकरिता तलावाचे पाणी सोडले. यामुळे शेतामध्ये अनावश्यक तुडुंब पाणी साचलेले आहे.तलाव परिसरातील शेती जलमय झाल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कंत्राटदाराला असे करण्यास मज्जाव केला. परंतु अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची परवानगी दिल्याचे सांगून पाण्याचा अपव्यय सुरूच ठेवला आहे. सध्या जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात असताना पाटबंधारे विभागाने तलावाचे पाणी सोडण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला असून संतापही व्यक्त केला जात आहे. संबंधितांनी दखल घेऊन कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
बांधकामाकरिता सोडले चक्क तलावाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:34 PM
उन्हाच्या दाहकतेने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून पाणी टंचाईची तीव्रता सर्वत्र जाणवू लागली आहे.
ठळक मुद्देकंत्राटदाराचा प्रताप : ऐन पाणी टंचाईत तलाव होत आहे रिकामा; गावकरी संतप्त