कोरपना ते गडचांदूर या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या मार्गावरून तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागते आहे. सदर मार्ग हा जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर त्वरित चौपदरीकरण होणे आवश्यक होते. मात्र महामार्ग घोषित होऊन तीन वर्ष लोटूनही केवळ डागडुजीच केली जात आहे. यातच रस्त्याच्या बाजूच्या कडाही दबल्या आहे. यामुळे रात्रीचा प्रवास जोखमीचा बनला आहे. रस्त्यावरील डांबरही उखडले आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतातील पिके काळवंडली आहे. वाहतूकदारांना त्वचा व श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सुरू असलेले कामही थातुर-मातूर पद्धतीने होत असल्याने रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था होण्याची चिन्हे आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
--
दिशादर्शक फलकाचा अभाव
कोरपना ते गडचांदूर मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक, अंतर, वळण रस्ते, गाव फलक नसल्याने नवीन व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर फलक लावावे, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यातच राज्य सीमेवरीलही सीमा स्वागत फलक रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे. त्याचीही दुरुस्ती चार वर्षे लोटूनही झाली नाही.
वाहतुकीचा खोळंबा
या मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. यातच रस्त्याच्या मधोमध बऱ्याच ठिकाणी खोदकाम केले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तासनतास वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.