कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागत आहेत.
रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या
कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रुग्णालयात उपचारासाठी कोरपना, जिवतीसह यवतमाळ जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील रुग्ण येतात. सद्यस्थितीत रुग्णालय ३० खाटांचे आहे. तसेच विविध विभाग नसल्याने रुग्णांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दर्जा वाढवावा, अशी मागणी केली जात आहे.
कृषिपंपाच्या बिलात दुरुस्ती करावी
भद्रावती : वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकºयांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. शिवाय, काही शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. मनमानी देयक पाठविल्याने शेतकऱ्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे आधी बिलात दुरुस्ती करावी. त्यानंतरच भरणा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
वरोरा : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.
डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी
कोरपना : येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील रुग्णालयात यवतमाळ जिल्हा व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने नेहमीच गर्दी असते. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना चंद्रपूर किंवा इतरत्र उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बस वेळापत्रक नसल्याने प्रवाशांची गैरसोय
गडचांदूर : चंद्रपूर-आदिलाबाद राज्यमार्गावर असलेल्या काही बसथांब्यावर बस वेळापत्रक फलक लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. येथून आदिलाबाद, नांदेड, कोरपना, परसोडा, चंद्रपूर, राजुरा आदी शहरांकडे बसेस नियमित धावतात.
बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या. तसेच रस्ता तयार करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.