सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने येथील शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. परिणामी, दुबार पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे.
येथील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व पारंपरिक व्यवसाय आहे. गावातील अनेक कुटुंबे शेती हा व्यवसाय करूनच त्यांची उपजीविका करतात. शिवाय या व्यवसायावरच आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधतात. या गावाच्या शिवारात जवळपास तीन तलाव आहेत. या तिन्ही मोठ्या तलावामुळे परिसरातील शेतकरी हजारो हेक्टरवर खरीप आणि रब्बी पिके घेत असतात; परंतु जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. येथील शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सदर तलावाच्या पाण्याने अंदाजे पाचशे हेक्टरवरील शेती दुबार सिंचित केल्या जाते. तलावात गावातील गोरक्ष मच्छिमार सोसायटीमार्फत मत्स्य व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मागील जवळपास तीन ते चार वर्षांपासून या तलावाच्या गेटच्या लोखंडी पाट्या पूर्णपणे जिर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे पर्जन्यवृष्टी होऊनसुद्धा तलावाच्या पाण्याची पातळी शून्यावर आली आहे. यासंदर्भात गेट दुरुस्ती करण्याकरिता लाभधारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, सिंचाई शाखा नागभीड आणि सिंदेवाही विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली; मात्र त्यांना सदर विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
संबंधित पाटबंधारे विभागाच्या सिंचाई शाखेने उदासीनता बाजूला सारून या बाबीची गंभीर दखल घेत तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हदास शेंडे व लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.