चंद्रपूर : सकारात्मक विचार ही भगवान बुद्धाची शिकवण असल्याचे प्रतिपादन माईन्ड पॉवर ट्रेनर डॉ. सोनिया जडाजी यांनी केले. डॉ. आंबेडकर चौक दुर्गापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की सकारात्मक विचार केल्यास आपल्याला सकारात्मक परिणाम मिळतात. हे जगाला सर्वात पहिल्यांदा भगवान बुद्धानी सांगितले. विपशना, ध्यानसाधना आणि माईंड पॉवर ही भगवान बुद्धाची देण आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी संगीत फुलझेले होते. फुलझेले अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जग विनाशाकडे चालले आहे, अशा वेळेस जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. कार्यक्रमाला धम्मगुरु भंते अनिरूद्ध यांची विशेष उपस्थिती होती. भंते अनिरूद्ध यांनी धम्माच्या आचरणावर भर दिला. तसेच त्यांनी हा धम्म विज्ञानावर आधारित असल्याचे सांगितले. यावेळी बुद्ध भीम गित गायन स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमाना माल्यार्पन आणि दीप प्रज्वलनाने झाली. प्रथम भंते अनिरूद्ध यांनी तथागत बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना डॉ. सोनिया यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आरोही फुलझेले यांनी डॉ. आंबेडकरांची भूमिकाही साकारली होती. (शहर प्रतिनिधी)
सकारात्मक विचार ही बुद्धाची शिकवण - जडाजी
By admin | Published: May 22, 2014 11:48 PM