दुचाकीस्वार बचावले : सफाई करणारे दोन मजूर जखमी
दुर्गापूर : येथील ‘रोप वे’च्या ओव्हर ब्रिजची सफाई करीत असताना पाट्या तुटून दोन मजूर खाली पडून जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री ९ वाजता रोप वे वरून कोळसा ब्रिज खालून जाणाऱ्या दुचाकीवर पडला. यात दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. रोप वेची लगेच दुरुस्ती न केल्यास येथे गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे.दुर्गापूर खुल्या कोळसा खााणीतील कोळसा वीज केंद्रात वाहून नेण्याकरिता वीज व्यवस्थापनाने रोप वे चे बांधकाम केले आहे. हा रोप वे दुर्गापूर मार्गाला ओलांडून वीज केंद्रात जातो. यावरुन रोज २४ तास कोळशाची वाहतूक सुरू असते. त्यावेळेस येथे कसल्याही प्रकारचा अपघात घडू नये याकरिता या मार्गावर दोन ओव्हरब्रीज बांधण्यात आले आहेत. रोप वे वरुन कोळशाची वाहतूक सुरू असताना यातील कोळसा थेट दुर्गापूर मार्गावर न पडता या ओव्हरब्रीजमध्ये पडतो. याच्यावर कोळसा साचून ढीग तयार झाल्याने १५ एप्रिलला याची साफ सफाई सुरू होती. दरम्यान ब्रीजच्या दोन पाट्या तुटून दोन मजूर थेट दुर्गापूर मार्गावर खाली पडून गंभीर जखमी झाले होते.