आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ग्रामीणांना सुरक्षित जीवन व सुनिश्चित भविष्य प्राप्त व्हावे, या उदात्त भूमिकेतून केंद्र शासनाने टपाल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण टपाल विमा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीणांकरिता विविध पॉलिसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सांसद आदर्श ग्राम असलेल्या चंदनखेडा या गावास ग्रामीण डाक जीवन विमा ग्राम बनविण्याचा संकल्प टपाल विभागाने केला आहे. या विमा पॉलिसीचा स्वयंस्फूर्तीने लाभ घेवून लोकांनी आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित राखावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.टपाल विभागाच्या वतीने चंदनखेडा येथे ग्रामीण टपाल जीवन विमा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ना. अहीर बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, गायत्री बागेसर, तहसीलदार शितोडे आदी उपस्थित होते. ग्रामीण जनतेच्या हिताची ही जीवन विमा योजना असून या योजनेचे शेतकरी, शेतमजूर व गावातील नागरिकांना महत्व पटवून देतानाच या टपाल विमा योजनेचा लाभ घेण्यास उद्युक्त करण्याची जबाबदारी टपाल विभागाच्या अधिकारी, कमरचाºयांनी घ्यावी. सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक व गावातील शासकीय कर्मचाºयांनीसुद्धा या योजनेचे महत्व ग्रामस्थांपर्यंत पोहचवून त्यांचे भावी जीवन सुरक्षित व सुनिश्चित होईल, यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.ते पुढे म्हणाले, शेतीपूरक जोडधंदे हे शेतकऱ्यांची गरज असून याला विमा योजनेची जोड प्राप्त झाल्यास शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना भक्कमपणे आर्थिक सुरक्षा मिळेल. टपाल विभागाद्वारे सुरु झालेल्या या विमा पॉलिसींमध्ये कमी विमा हप्त्यात अधिक बोनसचा लाभ देय असल्याने व अन्य विमा कंपनीच्या तुलनेत ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी अंतर्गत अधिक बोनस मिळत असल्याने ग्रामस्थांना एक प्रकारे हे सुरक्षा कवच असल्याचे ना. अहीर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरु करुन ग्रामीण व शहरी लोकांना सुरक्षितता प्रदान केली आहे. त्यामुळे अशा लोकाभिमुख विमा योजनेचा लाभ सांसद आदर्श ग्रामातील लोकांनी घेवून या गावास विमा ग्राम बनवून इतरांपुढे आदर्श ठेवावा असेही ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी सांगितले.या मेळाव्यात ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकांना पासबुकचे तसेच ग्रामीण टपाल विमा पॉलिसीधारकांना पॉलिसीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सोनकुसरे, नरेंद्र जीवतोडे, डेविस बागेसर, विठ्ठल कापकर, सुनील मुडेवार, पंकज पराते व चंदनखेडा येथील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
सुरक्षित भविष्यासाठीच टपाल विमा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:55 PM
ग्रामीणांना सुरक्षित जीवन व सुनिश्चित भविष्य प्राप्त व्हावे, या उदात्त भूमिकेतून केंद्र शासनाने टपाल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण टपाल विमा योजना कार्यान्वित केली आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : चंदनखेडा सांसद आदर्श ग्राम होणार विमाग्राम