कोरपना : तालुक्यातील मध्यम सिंचन प्रकल्प असलेल्या पकडीगुड्डम येथे नाम व प्रकल्प अशी माहिती देणारे फलक नाही. त्यामुळे प्रकल्पाविषयी माहिती उपलब्ध होत नाही. या ठिकाणी हे दोन्ही फलक लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी, कोरपना - जिवती तालुक्याच्या सीमेवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंबुजा सिमेंट उद्योग व परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवले जाते. हा भाग निसर्गरम्य असल्याने अनेक पर्यटक दूरवरून येथे भेट देत असतात. मात्र सिंचन विभागाने या भागाचे पर्यटकांच्या दृष्टीने अपेक्षित सौंदर्यीकरण केलेले नाही. शिवाय प्रकल्पस्थानी कुठलाही कर्मचारी राहत नाही. त्यामुळे हा प्रकल्प रामभरोसे पडला आहे. तसेच येथील कालवेही झुडपांनी बुजले गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणीच पोहोचत नाही.
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.