चोरट्यांचे फावतेयं : चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक हैराणचंद्रपूर : पोलीस चौकीत कार्यरत पोलीस रात्रीच्यावेळी चौकीच्या हद्दतीत गस्तीवर असावेत, अशी अपेक्षा असताना त्याच पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदीवर जुंपण्यात येत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहेत. त्यातून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.चंद्रपूर शहरात नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यात वडगाव चौकी, महाकाली चौकी, रयतवारी, बंगाली कॅम्प, बाबुपेठ पठाणपुरा, घुटकाळा आदी पोलीस चौक्यांचा समावेश आहे. परिसरात एखादी गंभीर घटना घडल्यास संबंधित पोलीस चौकीत जाऊन नागरिकांना घटनेची माहिती देता यावी, अथवा त्यासंदर्भात तक्रार करता यावी, यासाठी या पोलीस चौक्या उभारण्यात आल्यात. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आलेत. हे कर्मचारी दिवसभर आपले काम इमाने-इतरबारे करतात. मात्र ११ वाजतानंतर त्यांना नाकाबंदीसाठी तैनात केले जाते. तेथे त्यांची अकारण ऊर्जा खर्च होत आहे. या नाकाबंदीतून आजवर किती गुन्हे उघडकीस आलेत, हादेखील संशोेधनाचा विषय ठरला आहे. पोलीस चौकीत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकीच्या हद्दीतील परिसराचा पूर्ण अभ्यास असतो. परिसरातील गुन्हेगारांचीही त्यांना ओळख असते. या उलट गस्तीवर पाठविण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरातील ना रस्ते माहित असतात, ना गुन्हेगाराची ओळख असते. चौकीतील कर्मचारी मात्र या विषयात ‘अपडेट’ असतात. त्यांचे त्या परिसरातील ‘सोर्स’ देखील स्ट्रॉंग असतात. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी चौकीतील पोलीस कर्मचारीच यशस्वी होऊ शकतात. असे असले तरी ज्यांंना परिसराचा, गुन्हेगारांचा कुठलाही अभ्यास नसतो, अशांना रात्रीच्या गस्तीवर पाठविले जात आहे. त्यातून चोरट्यांचे फावत आहे. शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढगेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद सुरू आहे. पोलिसांच्या रात्रगस्तीलादेखील चोरटे जुमानत नसल्याचे चित्र आहे. काही भागात पोलिसांची गस्तच होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मागील चार दिवसांत महाकाली पोलीस चौकीतील कर्मचारी रात्रीच्यावेळी नाकाबंदी करण्यात गुंतून असताना लालपेठ व भिवापूर परिसरात चोरीच्या घटना घडल्याची माहिती आहे. नाकाबंदीही आवश्यकगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाकाबंदीही आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी चौकीतील पोलीस कर्मचारी न ठेवता अन्य कर्मचाऱ्यांना तैनात केल्यास त्याचा फायदा अधिक होऊ शकतो. चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीवर पाठविल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते.
चौकीतील पोलीस नाकाबंदीवर तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 1:15 AM