आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू असताना कडक उन्ह तापत आहे. अशातच अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. ही समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९५८ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तीन टप्प्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी अंदाजे १८ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांचा खर्च येणार आहे.गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच नदी-नाले पूर्ण भरले नाही. परिणामी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे स्त्रोत असलेले नदी-नाले कोरडे पडले असून आतापासूनच काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ९५८ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे कृती आराखड्यात म्हटले आहे.पाणीटंचाई निर्माण होणाºया गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर असा पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा तर एप्रिल ते जून महिन्यात करायच्या उपाययोजना असा तिसरा टप्पा तयार केला आहे. या तीन टप्प्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये अप्रचलित उपाययोजनांमध्ये विहीरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोअर, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे तर प्रचलित उपाययोजनांमध्ये प्रगतिपथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहीर हातपंपासह देणे, नवीन कुंपनलिका देणे, तात्पुरती पूरक योजना राबविणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, हातपंपाची दुरूस्ती, धरणामध्ये, तलावामध्ये चर खोदणे अशी कामे केली जाणार आहेत.प्रचलित उपाययोजनांमध्ये पहिल्या टप्प्यात २७३ गावांमध्ये २९७ कामे, दुसºया टप्प्यात २५३ गावांमध्ये ३२५ कामे तर तिसºया टप्प्यात ४५ गावांमध्ये ६२ कामे केली जाणार आहेत. यासाठी १७ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे कृती आराखड्यात म्हटले आहे.१३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारसंभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. मार्च ते जून या महिन्यात १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असून ५ लाख ८५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. या तेरा गावांमध्ये भद्रावती तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील ४ तर जिवती तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.१८ कोटी ८१ लाखांचा खर्च अपेक्षितजिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या ९५८ गावांमध्ये उपाययोजना म्हणून १३६१ कामे आराखड्यात घेण्यात आली आहेत. यासाठी १८ कोटी ८१ लाख १० हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. यामध्ये अप्रचलित उपाययोजनांसाठी ३८७ गावांमध्ये ६७७ कामे करण्यासाठी १ कोटी ७६ लाख २५ हजार रूपये तर प्रचलित उपाययोजनांमध्ये ५७१ गावांमध्ये ६८४ कामे करण्यासाठी १७ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयाचा खर्च येणे अपेक्षित आहे.नळ योजनांच्या दुरूस्तीवर भरथकीत विद्युत देयके, पाईपलाईन फुटणे अशा कारणांमुळे अनेक नळ योजन बंद असतात. तर पाणी पातळी खालावल्याने किंवा नदीची धार आटल्यानेही काही नळ योजना बंद पडतात. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने विशेषता नळ योजनांच्या दुरूस्तीवर जास्त लक्ष दिले जाणार आहे. यासाठी १० कोटी २३ लाखांचा खर्च अंदाजीत करण्यात आला असून १९५ गावांचा यात समावेश आहे.
९५८ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:55 PM
मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू असताना कडक उन्ह तापत आहे. अशातच अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा कृती आराखडा तयार : तीन टप्प्यात होणार उपाययोजना