चंद्रपूर : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचे मिशन सुरू केले आहे. पक्षाचे निरीक्षक नदीम जावेद व प्रदेश काँग्रेसचे समन्वयक संजय दुबे जिल्ह्यात दाखल झाले असून इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणी करीत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व ब्रह्मपुरीत इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी पक्ष निरीक्षकांपुढे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चंद्रपुरात आ. नदीम जावेद व संजय दुबे यांनी काँग्रेसच्या सेवादलाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुभाष गौर, विनायक बांगडे उपस्थित होते. यावेळी ११ इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी दावेदारी केली. यावेळी सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले होते. यात अॅड. प्रमोद आनंद, देवानंद लांडगे, सुधीर गारंगल, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, महेश मेंढे, चिन्ना नलभोगा, रत्नमाला बावणे, ललित मोटघरे आदींचा समावेश होता. पक्षनिरीक्षकांपुढे सर्वांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मागील २० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. या मतदार संघातून भाजपाला मुक्त करण्यासाठी पक्ष निरीक्षकांनी उमेदवारांची कसून चाचपणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, प्रकाश पाटील मारकवार, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, घनश्याम मुलचंदानी, पंचायत समिती सदस्य अनकेश्वर मेश्राम, डॉ. रजनी हजारे, दिलीप माकोडे, हर्षल चिपळूणकर, प्रमोद बोरीकर, विनोद अहीरकर यांच्यासह १५ जणांनी मुलाखती देत शक्ती प्रदर्शन केले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रासाठी पक्ष निरीक्षकांनी गोसीखुर्द विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली, मूल येथील इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित झाले होते. राजेश कांबळे, अशोक भैय्या, देविदास जगनाडे, दिनेश चिटनूरवार, नंदा अल्लूरवार, देवराव भांडेकर, अरविंद जयस्वाल, संचित पोरेड्डीवार, पंकज गुड्डेवार आदींनी पक्ष निरीक्षकांपुढे आपली दावेदारी मांडली. (शहर प्रतिनिधी)
पक्ष निरीक्षकांपुढे इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: July 21, 2014 12:05 AM