बल्लारपूर : वीज वितरण कंपनीच्या धोरणाविरोधात येथे भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. नगरपरिषद भवनापासून भाजपा कार्यकर्ते एकत्रित येऊन येथील गणपती वाॅर्डातील वीज वितरण कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. तदनंतर मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर भाजपाकडून तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीच्या नावे निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी नगरपरिषद भवनाजवळ विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची वीज बिलाच्या सक्तीच्या कारवाईचा विरोध करण्यात आला. या आंदोलनात नगर परिषद उपाध्यक्ष मीना चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, शिवचंद व्दिवेदी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, प्रदेश भाजपाचे महासचिव अजय दुबे, वैशाली जोशी आदी उपस्थित होते.