दोन सबस्टेशन मंजूर : वीज वितरण वरोरा उपविभागाची कामे प्रगतीपथावर वरोरा : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज ग्राहकांना वीज कायमस्वरुपी सुरळीत पुरवठा व्हावा, याकरिता वरोरा शहराकरिता दोन सबस्टेशन कार्यान्वित करण्याची कित्येक वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. वरोरा शहराकरीता वीज वितरण कंपनीने दोन सब स्टेशन निर्मिती करीता जागेचा प्रश्न निकाली काढला असून कामाकरिता एजन्सी नियुक्त केली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयाला वरोरा तालुका, चिमूर व भद्रावती तालुक्यातील १८५ गावे जोडण्यात आली आहे. आठ वितरण केंद्र असून पाच उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. वरोरा शहरात दोन फिडरवरुन वीज पुरवठा मागील कित्येक वर्षांपासून करण्यात येत होता. परंतु वरोरा शहराची वाढती लोकसंख्या व दिवसागणिक विजेची वाढती मागणी, यामुळे शहरातील काही भागात कमी विजेचा दाब मिळत होता. अशा अनेक तक्रारी कित्येक वर्षांपासून सुरू होत्या. ही समस्या वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता विनोदकुमार भोयर यांनी रुजू होताच हातात घेतली व तिसरे फिडर सुरू करून वरोरा शहरा वासीयांना वारंवार कमी वीज दाबापासून मुक्त केले. वरोरा शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास संपूर्ण शहर अंधारामध्ये राहत होते. आता नव्याने झालेल्या फिडरमुळे ज्या भागात विद्युत पुरवठा नादुरुस्त असेल तोच भाग दुरुस्त होईपर्यंत अंधारात राहणार आहे. वरोरा २२० केव्ही उपकेंद्रातून शेगाव, चंदनखेडा, टेमुर्डा, खांबाडा या उपकेंद्राना ३३ केव्ही ही शेगाव या वाहिनीवरुन जून २०१५ पूर्वी वीज पुरवठा करण्यात येत होता. एकाच वाहिनीतून पाच वीज उपकेंद्राचा कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत होता. यातील दोष हेरुन वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून व त्यांनी मदत घेवून ३३ केव्ही वरोरा- नंदोरी या जुन्या वाहिनीचे ३३ केव्हीमध्ये रुपांतर केले. खांबाडा व टेमुर्डा या उपकेंद्राला वीज पुरवठा करुन वीज समस्या निकाली निघाल्याची माहिती अभियंता विनोद भोयर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यातील वीज समस्या कायमची सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 1:32 AM