आंदोलनाचा इशारा : महानिर्मिती बचाव संयुक्त कृती समितीचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा व भुसावळ येथील तब्बल १५ वीज निर्मिती प्रकल्प बंद केले आहेत. त्याच्या निषेधार्थ वीज कामगार संयुक्त कृती सतीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गेटवर द्वारसभा घेण्यात आली. या सभेमध्ये भारतीय कामगार सेना मनसे कामगार सेना, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, ग्रॅज्युएट इंजि. असोसिएशन, पॉवर फ्रट, भारतीय मजदूर संघ, वर्कर्स फेडरेशन केमिस्ट असोसिएशन, सबॉर्डिनेट इंजि. असोससिएशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना, इंटक त्याचप्रमाणे भारतीय कामगार कंत्राटी कामगार सेना, भारतीय मजदूर कंत्राटी कामगार संघटना आदींनी भाग घेतला. सभेला भारतीय कामगार सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष राजन भानुशाली व वितरण क्षेत्राचे केंद्रीय सहकार्याध्यक्ष मधुकर सुरवाडे उपस्थित होते. भारतीय कामगार सेनेचे निर्मिती क्षेत्राचे केंद्रीय सहकार्याध्यक्ष के.एन. देवताळू यांनी वीज निर्मिती प्रकल्प शासनाने धोक्यात आणल्याचा आरोप केला. या प्रकल्पांना अदानीसारखे मोठे उद्योजक हायजॅक करून राज्यातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांचे खाजगीकरण करुन विजेचा दर आठ रुपये प्रति युनिट करून जनतेला वीज भाववाढीसाठी वेठीस धरण्यात येईल, याची जाणीव त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे जीईएचे सचिव नवल दामले यांनी महाजनकोची सखोल माहिती दिली. पावर पॉर्इंटचे कार्याध्यक्ष प्रदीप ढाले यांनी महाजनकोला वाचविण्याकरिता सर्वांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले. वर्कर्स फेडरेशनचे ठाकूर यांनी भविष्यातील आंदोलनात कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले विद्युत क्षेत्र तांत्रिका कामगार संघटनेचे प्रकाश फाले कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील, असे सांगितले. त्यानंतर केमिस्ट असोसिएशनचे कस्तुरे यांनी प्रकल्पामध्ये येणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याबाबत माहिती दिली. एसीए संघटनेचे बडगुजर यांनी बंद १५ प्रकल्प सुरू होईपर्यंत सर्वांनी एकजूट राहून शासनाविरुद्ध लढा देण्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून केले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील वीज प्रकल्प धोक्यात
By admin | Published: July 20, 2016 12:44 AM