घनश्याम नवघडे नागभीडबिबट झाडावर आहे, अशी माहिती संपूर्ण नागभीड परिसरात क्षणार्धात पोचली; पण वनविभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना या घटनेची कोणतीच गंधवार्ता न लागल्याने त्या बिबट्याला तब्बल पाच तास वेठीस राहावे लागल्याची घटना चनेवाडा (पवणी) बिटातील कक्ष क्र. ३१९ मध्ये शुक्रवारी सकाळी घडली. नागभीड तालुक्यातील मांगली गावाजवळच भंडारा जिल्ह्याची सिमा लागून आहे. ही सीमा जंगलव्याप्त आहे. जिथे नागभीड तालुक्याची सीमा समाप्त होते, त्याच्या ५० फूटावरच या बिबट्याने झाडावर ठाण मांडले होते.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, सकाळी ८ वाजताच्या सुमारास काही कोर्चुल्या या बिबट्याच्या मागे लागल्या. एवढेच नाही तर या कोर्चुल्यांनी या बिबट्याची चांगलीच पळता भूई थोडी केली. अतिशय घाबरलेल्या स्थितीत हा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बिबट या झाडाच्या अगदी उंच भागावर चढला. हे ठिकाण नागभीड तालुक्यातील मांगली मोहाळी, बनवाई बिकली, कानपा, बाम्हणी या गावांना जवळ असल्याने क्षणार्धात ही माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. या गावातील शेकडो लोकांनी बिबट पाहण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. पाहता पाहता लोकांचा चांगलाच जमाव या ठिकाणी तयार झाला. मग या जमावाकडून बिबट्याचे फोटो घेवून ते व्हायरल करण्यात आल्याने या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली.जमावाकडून बिबट्याचे फोटो काढणे, त्याला दगड मारणे आदी प्रकारही या ठिकाणी करण्यात आले. पण वन विभागाला या बिबट्याबाबत माहिती देण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. तब्बल चार-साडे चार तास लोकांकडून हा प्रकार सुरु होता. एक प्रकारे बिबट लोकांच्या नजर कैदेत बंदीस्तच होता. दरम्यान, या घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास नागभीडचे वन अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी सर्वप्रथम तेथे असलेल्या जमावाला पांगविले. त्यानंतर सदर बिबट झाडावरुन खाली उतरला, अशी माहिती आहे. नागभीड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी ही कार्यवाही केल्यानंतर पवणी वनविभागाची कुमक घटनास्थळी पोहचली, अशी माहिती आहे. वास्तविक घटनास्थळापासून चनेवाडा, कन्हाळगाव हे पवणी तालुक्यातील वन बिट फार अंतरावर नाहीत. नागभीड तालुक्यात सर्वत्र बिबट झाडावर असल्याची माहिती पोहचते. लोक शेकडोच्या संख्येने बिबट पाहण्यासाठी गर्दी करतात. पण पवणी वनविभागाला याची गंधवार्ता असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
बिचारा बिबट... पाच तास वेठीस
By admin | Published: June 04, 2016 12:38 AM