चंद्रपूर : देशात प्रमुख प्रदूषित जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा उल्लेख होतो. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घुग्घूसचा उल्लेख होतो. घुग्घूसमधील प्रदूषणाला येथील अन्य कारखान्यांपेक्षा लाॅयड्स मेटल प्रा.लि.चे प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. येथील शेतीपिकांचे नुकसान तर होतच आहे. शिवाय या कंपनीच्या परिसरात गरोदर माता, लहान मुलांना खोकला, अस्थमासारख्या आजारांनी ग्रासले आहे, कॅन्सर दस्तक देत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर प्रश्न लक्षवेधी सूचना क्रमांक ३४० नुसार विधानपरिषदेत पोहोचले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील लाॅयड्स मेटल प्रा.लि. या कंपनीच्या प्रदूषणामुळे लगतच्या परिसरातील शेती खराब हाेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या कंपनीच्या प्रदूषणाद्वारे तेथील धुराचा त्रास होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यामध्ये गरोदर माता, लहान मुलांना खोकला, अस्थमा यांसारखे गंभीर आजार जडले आहे. तसेच, कॅन्ससारखे राेग होण्याच्या घटना निदर्शनास येत आहे. ‘एनजीटी’ने नवीन सुविधा बसविण्यासाठी सांगितले असताना या कंपनीने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
नीरीने दिला प्रकल्प बंद करण्याचा अहवाल...
प्रदूषणासाठी काम करणाऱ्या ‘नीरी’ या संस्थेने या कंपनीची पाहणी करून हा प्रकल्प बंद करून नव्या स्वरूपात हा प्रकल्प उभारण्यात यावा, असा अहवाल दिला आहे. तरीही अहवालानुसार नव्या स्वरूपात प्रकल्प उभा राहिलेला नाही. असे असताना चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व बाबींची चौकशी करून या कंपनीवर कारवाई करण्याची आवश्यता आहे, या गंभीर बाबींकडे लक्षवेधी सूचनेतून लक्ष वेधण्यात आले आहे.