चंद्रपूर : शहरातील डॉ. ज्योती चिद्दरवार यांच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी उपचाराची कागदपत्रे बदलविल्याचा आरोप डॉक्टरावर करीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोनिका राजेश आयतवार (३२) असे मृतक महिलेचे नाव आहे.
राजेश आयतवार यांनी पत्नी मोनिका गर्भवती असतानापासून शहरातील रामनगर परिसरात असलेल्या डॉ. ज्योती चिद्दरवार यांच्याकडे तपासणी व उपचार घेत होत्या. मोनिका यांची पहिली प्रसूतीसुद्धा डॉ. चिद्दरवार यांच्याकडेच झाली होती. मागील ९ महिन्यांपासून मोनिकावर उपचार सुरू होते. दरम्यान, प्रसूतीसाठी ७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी सकाळीच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना प्रसूती कक्षात नेण्यात आले. त्यावेळी मोनिका स्वतः चालत प्रसूती गृहात गेल्या होत्या. मात्र, लगेच अर्ध्या तासानंतर डॉ. ज्योती चिद्दरवार यांनी पती राजेश आयतवार यांना प्रसूतिगृहात बोलावून मोनिका व पोटातील गर्भ दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे राजेश भांबावून गेल्याने सुरुवातीला उपचाराचे कुठलेही कागदपत्र मागितले नाही. मात्र, थोडे सावरल्यावर त्यांनी कागदपत्र मागितले. तेव्हा त्यांनी कागदपत्रात फेरफार केला असल्याचा आरोप केला आहे.
नातेवाइकांचा संताप
बाळ व मातेचा मृत्यू झाल्याचा संदेश नातेवाइकांना मिळताच त्यांच्यामध्ये संताप व्यक्त झाला. अखेर डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले. महिलेचा भाऊ व पती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. मात्र, हा मृत्यू कशाने झाला यांचे समाधानकारक उत्तर डॉ. ज्योती चिद्दरवार देऊ शकल्या नाही. प्रसूती वेदना होण्यासाठी देण्यात आलेले इंजेक्शन मुदतबाह्य होते की, ते इंजेक्शन अतिरिक्त मात्रेत देण्यात आले असा संशय आता व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मोनिकाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. दरम्यान, मोनिकाच्या आकस्मित मृत्यूमुळे आयतवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
डाॅक्टरकडून प्रतिसादच नाही
या संदर्भात नेमके कारण जाणून घेण्यासाठी डाॅ. ज्योती चिद्दरवार यांच्याशी भ्रमणध्वनी व दूरध्वनीवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे घटनेमागील नेमके कारण कळू शकले नाही.