चंद्रपूर, परतवाडा : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चारही वन्यजीव विभागांतर्गत आज १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात वन्य प्राणिगणनेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या प्राणिगणनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन्यजीवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद लाभला असून, ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले आहे.
उभारण्यात आले ४० मचाण
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले की, यंदा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभ्यात ४० मचाणांवर ८० जणांच्या माध्यमातून वन्यजीव गणना केली जाणार आहे, याशिवाय डॉक्टर, रुग्णवाहिका आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मोजणीसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्यासाठी अनेक जिल्ह्यांतील वन्यजीवप्रेमींनी बुकिंग केले असून, ते फुल्ल झाले आहे. ताडोबातील मचाण पर्यटन वर्षभर सुरू असते. त्यामुळे ताडोबात येणाऱ्यांना हे नवीन नसून, या दिवशी प्रखर प्रकाशामुळे प्राणी स्पष्ट दिसतात.
मेळघाटात ४६६ पाणवठ्यांवर मचाण
वाघ, अस्वल, रानगवे, दिवटे, लांडगे, कोल्हे या वन्यप्राण्यांसह सरपटणारे प्राणी व पक्ष्यांचे दर्शन वन्यप्रेमींना होणार असून, त्याची नोंद त्यांना करावी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागात असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशा एकूण ४६६ पाणवठ्यांवर प्राणी गणनेकरिता मचाण तयार केल्या आहेत. प्राणिगणनेची संपूर्ण तयारी झालेली असून, पाणवठ्यांवर ठिय्याकरिता निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सशुल्क आरक्षण पूर्ण केले आहे. मुंबई, कोल्हापूर, नागपूरसह मध्य प्रदेशातूनही वन्यप्रेमींनी यात सहभाग नोंदविला आहे. नियमांचे काटेकोर पालन त्यांना या दरम्यान करावे लागणार आहे.
दोन गणांसह १ वन कर्मचारी
गणनेत सहभागी असलेल्या प्रगणकांना १६ मे रोजी सकाळी ऑनलाइन बुकिंगनुसार नियुक्त केलेल्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. एक किंवा दोन प्रगणक आणि एक वन कर्मचारी एका मचाणावर बसविले जातील. त्यांना लेखी रेकॉर्ड दिला जाईल, ज्यामध्ये पाण्याच्या स्रोतावर पुढील २४ तासांत किती वन्य प्राणी दिसले, याची नोंद करावी लागेल. प्रगणना संपल्यानंतर, वनविभागाची एक जिप्सी प्रत्येक मचाणातून स्वयंसेवक घेईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ताडोबा व्यवस्थापनाने दिला आहे.