चंद्रपूर : शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाच्या गंंभीर समस्यांवर विचारमंथन, जनजागृती, विविध उपक्रमांची अंमलबजावणी व संशोधन अहवाल तयार करून, राज्य शासनाकडे पाठविण्यासाठी नागरिक, तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक व कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली चंद्रपूर क्लीन एअर अॅक्शन ग्रुप शुक्रवारी गठीत झाला.
चंद्रपूर क्लीन एअर अॅक्शन ग्रुपचे समन्वयक म्हणून ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक डॉ.योगेश दुधपचारे, इकोप्रोचे बंडू धोत्रे आदींनी जबाबदारी स्वीकारली. शहरातील वाढते वायुप्रदूषण दृश्य स्वरूपात दाखविण्यासाठी कृत्रिम फुप्फुसांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृत्रिम फुप्फुसांची स्थापना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल, असेही जाहीर केले. वायुप्रदूषणाचे नेमके प्रमाण कळण्यासाठी शहरात हवामापन यंत्राद्वारे हवेच्या गुणवत्तेचे मापन करण्यात येईल. या मॉनिटरिंगमधून हाती आलेल्या आकडेवारीचा विश्लेषण करून संशोधन अहवाल तयार करून, स्थानिक लोक प्रतिनिधी, महापालिका व पर्यावरणमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. आयोजनासाठी मुंबईतील वातावरण फाउंडेशनने पुढाकार घेतला होता. दिल्लीच्या पर्यावरण संस्थेचे सुनील दहिया, मुंबईतील वातावरण संस्थेचे भगवान केशभट, प्रा.सुरेश चोपणे यांनी प्रदूषणाचा आढावा सादर केला. यावेळी वातावरण संस्थेचे राहुल सावंत, रामगावकर, असर संस्थेचे बद्री चॅटर्जी, आरे कॉलनी मुंबईच्या आंदोलक राधिका जव्हेरी, प्रा.सचिन वझलवार, श्रमिक एल्गारच्या अॅड.पारोमिता गोस्वामी, श्याम धोपटे, डॉ.गोपाल मुंधडा, प्रा.विनोद गोरंटीवार, प्रा.सचिन वझलवार, प्रवीण जोगी, महेंद्र राळे, प्रा.महेंद्र ठाकरे, प्रा.नामदेव कंनाके, डॉ.अभिलाषा गावतुरे, भाविक येरगुडे, किशोर जामदार, नितीन मत्ते, गारगेलवार, दिनेश खाटे, मझहर अली, आदलाबादकर, नितीन रामटेके आदी उपस्थित होते.