लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शनिवारच्या दुपारी शहरात व तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण तालुक्यातच कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.ब्रह्मपुरी तालुक्याचे तापमान ४७ अंशाच्या जवळपास गेले होते. उन्हाच्या प्रचंड तिव्रतेने सगळ्यांना होरपळून काढले होते. प्रत्येकजण दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून उकाड्यापासून केव्हा मुक्ती मिळेल, याकडे लक्ष लागले होते. अशातच शनिवारच्या दुपारी ब्रह्मपुरी शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अर्धा तास पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे खरीप पिकाच्या शेतीचा हंगाम सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणत वेग आलेला नाही. तालुक्यात भात पिकाखालील क्षेत्र २८ हजार ४६८.७० हेक्टर आर असून १० हजार २३८.१२ हे.आर. बागायती तर १८ हजार २३०.५८ हे.आर. क्षेत्र जिरायती आहे. प्रचंड तापमानामुळे बहुतांश विहिरी, तलाव कोरडी झाली आहेत. तालुक्यात पाच हजार ६०.३२ हे.आर. क्षेत्र विहिरीच्या माध्यमातून ओलिताखाली येत असते तर सहा हजार २३६.०१ हे.आर क्षेत्र तलावाच्या माध्यमातून ओलिताखाली येते. या सर्वांना मान्सूनच्या पावसाची आतूरता निर्माण झाली आहे. शनिवारच्या पावसाने काही काळ गारवा निर्माण केला असला तरी अजूनही प्रचंड उकाडा कायम आहे. हवामानाच्या अंदाजानुसार वेंगुर्ले, मालवणच्या भागात मान्सून अडकल्यामुळे त्याची धाव मुंबईच्या दिशेने सुरू न झाल्याने विदर्भात पाऊस लांबणीवर जाण्याचे संकेत वर्तविले जात आहे. मान्सून लांबणीवर गेला तर खरीप हंगामात ब्रह्मपुरी तालुक्यातील पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.मान्सूनपूर्व पावसाची हजेरी तूर्त दिलासा देणारी असली तरी मान्सूनच्या पावसाच्या प्रतीक्षेत जनता आतुरली आहे.
मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By admin | Published: June 12, 2017 12:49 AM