मागणीला वेग : कोरपनाचे विभाजन करागडचांदूर : कोरपना तालुक्याचे विभाजन करुन गडचांदूर नवीन तालुका निर्माण करण्याबाबतचा मुद्देनिहाय प्रस्ताव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी महसूल आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे पाठविल्याची माहिती आहे.नवनिर्मित गडचांदूर तालुक्यात गडचांदूर मंडळातील सहा साझे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या सहा साझ्यामध्ये ४५ महसुली गावे समाविष्ट असून ४० आबाद व ५ रिठी गावे असून त्यांचे भौगोलिक क्षेत्र २४ हजार ४१४ हेक्टर आर आहे. या ४५ गावांची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ७६ हजार ३९५ एवढी आहे. १० हजार ७०७ सातबारामध्ये ५५४१ खातेदार आहेत. गडचांदूर मुख्यालय एक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. या तालुक्यात माणिकगड सिमेंट गडचांदूर, अल्ट्रॉटेक सिमेंट आवारपूर, अंबुजा सिमेंट उपरवाही, मुरली सिमेंट नारंडा असे चार मोठे सिमेंट उद्योग आहेत. प्रस्तावित गडचांदूर तालुक्याच्या मुख्यालयी ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांचे मुख्यालय गडचांदूर येथे आहे. प्रस्तावित नवनिर्मित गडचांदूर तालुक्यात ६३ हजार ६४ मतदार संख्या असून ६२ मतदार केंद्राच्या समावेश आहे. क वर्गात मोडणारी गडचांदूर मुख्यालयी एक नगर परिषद २६ ग्रामपंचायती आणि ४ पंचायत समिती गण आणि दोन जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे. महसूल वसुलीच्या बाबतीत नवनिर्मित कृषक जमीन महसूल ५३ हजार ६९७ रुपये, अकृषक जमीन महसूल ३ लाख ७० हजार ३२३ रुपये व करमणूक करबाबत एकूण ७ हजार ३१८ केबल जोडणीधारकांची संख्या आहे, असे अहवालात नमूद केले आहे. आयुक्ताकडे गडचांदूर तालुक्याची शिफारस केल्यानंतर आयुक्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. तालुक्याचे सर्व निकष पूर्ण होत असल्याचे अहवालात नमूद आहे.
गडचांदूर तालुक्याचा प्रस्ताव सादर
By admin | Published: January 24, 2016 12:54 AM