यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारकडून रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही, याबाबत व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत होती. त्यात ही चर्चा सुरू असताना खरीप हंगाम सुरू होण्यासाठी ‘इफको’ कंपनीने ७ एप्रिल २०२१ ला खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले; परंतु दुसऱ्याच दिवशी इफको कंपनीचे एमडी डॉ. यू. एस. अवस्थी यांनी ८ एप्रिलला ट्विट करून इफकोकडून ११.२६ लाख टन खते शेतकऱ्यांना मागील दरातच दिली जातील, असे सांगितले. त्याचप्रमाणे केमिकल व फर्टिलायझर्सचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कुठल्याही प्रकारे वाढ होणार नसल्याने सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती दिली. तसेच त्याबाबत माहितीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होणार नाही, हे निश्चित झाल्यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ झाल्याचा निर्णय झाल्याने याबाबत कृषी केंद्रचालकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक चटप, बोधी रामटेके, ॲड. वैष्णव इंगोले, सूरज गव्हाणे, केतन जुनघरे, सूरज जीवतोडे, सूरज अवताडे, उत्पल गोरे, निरज मत्ते, स्वप्नील झुरमुरे, मंगेश मडावी, रामचंद्र काकडे, अंकुर मल्लेलवार, निखिल खोके, निखिल बोंडे, हबीब शेख आदींनी केली आहे.
रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:26 AM