अनवर खान
पाटण : सध्या सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. भाजीपाल्यासह जवळजवळ सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. कुटुंबाचा मासिक खर्च वाढल्याने कुटुंब प्रमुखाची संसाराचा गाडा हाकताना दमछाक होत आहे.
घरगुती सिलिंडर व पेट्रोल, डिझेलच्या दरात तर उच्चांकी वाढ झाली आहे. असे असताना शासकीय पातळीवर महागाई कमी करण्यासंदर्भात काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या धान्यासह शेंगदाणे, साखर, साबुदाणा, डाळ, तांदूळ, गहू व इतर खाद्यपदार्थाचे भाव वाढले आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्यात हे दर आणखी वाढतच जात आहे. जिवती तालुक्यातील अनेक जण शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करतो. मात्र पीक निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अस्मानी संकट, विविध रोग यामुळे उत्पादन कमी होते. पीक निघाल्यानंतर त्याला भावही कमी मिळतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना शेतकऱ्यांना अक्षरश: रडू कोसळते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
पुन्हा स्वयंपाक चुलीवर
काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली. आता तर घरगुती सिलिंडर हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुलीच स्वयंपाकगृहात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.