भद्रावती : ‘स्वच्छतेचे पुजारी सापडले घाणीच्या विळख्यात’ या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दखल घेवून त्या मूर्ती विधिवत पूजा करून नगर परिषदेसमोर आणल्या. या घटनेने नगर परिषद प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. मूर्ती आणून ठेवणाऱ्यांच्या विरोधात मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी पोलिसात तक्रार केली. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही मूर्ती जप्त करून पोलीस ठाण्यात आणल्या.घुटकाळा वॉर्डातील झाडे प्लॉट येथील डॉ. संजय ठाकरे यांच्या दवाखान्यालगतच्या मोकळ्या जागेवर मागील १८ वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या मूर्ती घाणीच्या विळख्यात होत्या. त्यांनी स्वच्छतेचा वसा घेवून आपले संपूर्ण आयुष्य जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यास घालविले. अशाच विभूतींच्या मूर्ती घाणीच्या साम्राज्यात होत्या. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी त्या ठिकाणी जावून मूर्ती पाण्याने धुवून स्वच्छ केल्या. हारफुले वाहून नगर परिषदेच्या स्वाधीन केल्या. यासंदर्भात अमोल डुकरे, तिरूपती आडे, केवट, राजू वर्मा आदीनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)
स्वच्छतेचे पुजारी पोहोचले पोलीस ठाण्यात
By admin | Published: July 09, 2014 11:21 PM