मूल : तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, जनतेला आरोग्याची परिपूर्ण सेवा पुरविण्याच्या हेतूने जिल्ह्याचे केंद्रस्थान असलेल्या मूल येथे तत्कालिन शासनाने भव्य आणि सुसज्ज उपजिल्हा रुणालयाची निर्मिती केली. तालुक्याला लागून असलेल्या सिंदेवाही, सावली, मूल, पोंभूर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील असंख्य रुग्णांना या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ होईल, अशी आशा होती. मात्र रूग्णांना अडचणी व्यतिरीक्त काहीही मिळालेले नाही.रुग्णाला चंद्रपूरला जावे लागणार नाही व जनतेची धावपळ होणार नाही आणि आर्थिक भुर्दंड सुद्धा पडणार नाही, या हेतुने बांधण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयात जेवढे विभाग निर्माण केले, तेवढे विभाग सांभाळण्याकरिता शासनाच्या नियमानुसार उपजिल्हा रुग्णालयात एकूण ४६ कर्मचाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. मंजूर पदाची संख्या ४६ आहे. परंतु, आजच्या स्थितीत केवळ २९ पदे भरण्यात आलेली आहेत आणि १८ पदे अजूनही कित्येक दिवसापासून रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये वैद्यकीय अधीक्षक एक, सर्जन एक, बधिरीकरण तज्ञ एक, फिजीशियन १, वैद्यकीय अधिकारी एक, सहायक वैद्यकीय अधिकारी एक, परिसेविका एक, अधिपरिसेविका पाच, औषधी निर्माता एक, शिपाई एक, बाह्यरुग्णसेवक एक, शस्त्रक्रियागृह परिचर एक, मलमपट्टीधारक एक अशी पदे रिक्त असल्यामुळे तालुक्यातील भरती होत असल्याने रुग्णांना आणि जनतेला शासनाच्या सेवाविषयक धोरणाचा पाहिजे त्या प्रमाणात लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने याची दखल घेऊन रिक्त पदे भरण्याची मागणी माजी पं. स. सभापती संजय माकरवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूल उपजिल्हा रूग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: October 06, 2016 1:50 AM