शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात राजकुमार चुनारकर चिमूर एकेकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला नैसर्गीक आपत्तीमुळे उतरती कळा आली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. शेतकऱ्यांवर ओढवणाऱ्या नैसर्गीक संकटातून बाहेर काढण्यासाठी व काही प्रमाणात आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. हिच विमा योजना शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून तारणार आहे. शेती व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. मात्र मानवाचे निसर्गापुढे काही एक चालत नाही. त्यामुळे निसर्गाच्या अनियमित, लहरीपणामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात तोट्यात चालला आहे. त्यामुळे शेतकरी सदा कर्जात खितपत चालला आहे. या कर्जाच्या बोजातून निघता आले नाही तर अनेक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. मात्र नैसर्गीक संकटातून होणाऱ्या शेतकऱ्याच्या नुकसानीला काही प्रमाणात आर्थिक बळ मिळावे म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यासाठी निसर्गाचा सुटता साथ, पीक विमा देईल हात, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यापुढे आली आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी कुणीच धजावत नाही त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनास शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटातून तारणार आहे. (प्रतिनिधी) योजनेची वैशिष्ट्ये नैसर्गीक आपत्ती, कीड, अळी रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण. पिकाच्या नुकसानीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक. खातेदार व्यतीरिक्त भाडेपट्टीने व कुळाने शेती करणारे शेतकरीही योजनेस पात्र. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बीसाठी दिड टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के अमर्यादीत आहे. योजने अंतर्गत सर्व पिकासाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. योजनेच्या लाभासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व बँकेचे प्रतिनिधी मदत करणार आहेत. या पीक विमा योजनेचे विमा हप्ता जुलै महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत भरता येणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना तारणार
By admin | Published: July 15, 2016 1:12 AM