मूल : पंतप्रधान आवास योजनेतून सर्वांसाठी घरे २०२२पर्यंत बांधून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा केंद्राचा एक रुपयाही निधी प्राप्त न झाल्याने निधीअभावी ही योजना रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्र व राज्य शासन यांच्या अनुदानातून होत असलेल्या या योजनेसाठी राज्याकडून ३४.८ लाख रुपये प्राप्त झाल्याने कामाला सुरुवात झाली. मात्र, घराच्या परिपूर्तीसाठी केंद्र शासनाचा निधी प्राप्त न झाल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत. निधी मिळेल, या आशेने अनेकांनी राहाते घर तोडून कामाला सुरुवात केली. कामाला वेग येत असताना केंद्राने वाकुल्या दाखविल्याने घराचे काम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.
सर्वांसाठी घरे ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केल्यानंतर मूल नगर परिषदेने रितसर प्रस्ताव मागविले. यावेळी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून ८७ लाभार्थ्यांना २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता देण्यात आली. यातील ३४ लाभार्थ्यांनी कामाला सुरुवातही केली. या पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र शासन एक लाख ५० हजार रुपये, तर राज्य शासन एक लाख रुपये अनुदान मंजूर करीत असते. या योजनेसाठी केंद्र शासनाने १३०.५ लाख, तर राज्य शासनाने ८७ लाख रूपये मंजूर केले. यावेळी राज्य शासनाने ३४.८ लाख रुपये प्रत्यक्षात दिले. मात्र, केंद्राने एक रुपयाही रक्कम दिली नाही.
बॉक्स
केंद्राचा निधी मिळालाच नाही
राज्य शासनाच्या प्राप्त निधीवर ३४ लाभार्थींना त्यांच्या खात्यात रक्कम दिली. मिळालेल्या रकमेतून लॉकडाऊनच्या काळात रेती बंद असताना महागडी रेती घेऊन बांधकामाला सुरुवात केली होती. यावेळी १४ लाभार्थींनी पूर्णपणे बांधकाम केले, तर १८ लाभार्थींचे स्लॅबपर्यंत काम झाले आहे, तर दोन लाभार्थींचे लेंटरपर्यंतचे काम झाले असल्याचे दिसून येते. कुणाला एक हप्ता, तर कुणाला दोन हप्ते देण्यात आले आहेत. हा हप्ता राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आला. मात्र, केंद्र शासनाचा १३०.५ लाखांपैकी एक रुपयाही निधी प्राप्त न झाल्याने पुढील बांधकाम ठप्प झाले आहे.
बॉक्स
हिवाळा कसा काढावा
बांधकामासाठी घर पाडल्याने कसे तरी पावसाळ्यात निभावून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लाभार्थी सांगत आहेत. मात्र, पुढील येणारा हिवाळा कसा काढावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केंद्राचा निधी मिळाल्यास फार मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राच्या निधीकडे सर्व लाभार्थीचे लक्ष लागले आहे.
कोट
प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामासाठी एप्रिल-मे २०२०ला पहिला हप्ता ४० हजार व दुसरा हप्ता ऑगस्ट - सप्टेंबर २०२०ला ४० हजार असे ८० हजार रुपये मिळाले होते. उर्वरित रक्कम बचत गट व इतर मार्गांनी जमा करून बांधकामाला लावण्यात आले. मात्र, घर अपूर्णच आहे. बचत गटाचे व्याज वाढत आहे. यामुळे मानसिकता बिघडत असल्याने त्वरित निधी मंजूर करून दिलासा द्यावा.
- अनिल गुरुनुले, लाभार्थी, मूल.