आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:13 AM2019-05-26T00:13:34+5:302019-05-26T00:14:15+5:30
महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोईसाठी वर्धा नदीवर पाच बॅरेजची गरज आहे. जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करणे आणि नवीन उद्योग जिल्ह्यात कसे येईल, या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा भविष्यात प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तब्बल १५ वर्षानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सुरेश धानोकर यांच्या रुपाने काँग्रेसने भाजपच्या ताब्यात असलेला गड परत मिळविला. धानोरकरांच्या रुपाने काँग्रेसला अख्ख्या महाराष्ट्रात चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व मिळाले आहेत. या मतदारसंघाबाबत त्यांनी तयार केलेला ‘रोडमॅप’ नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खासदार धानोरकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्याचा एक भागच आदिवासी बांधवांचा आहे. त्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. त्यांचा घरकुलाचा प्रश्न गंभीर आहे. आदिवासी बांधवांना घरकुल उपलब्ध करून देणे हा आपला पहिला प्रयत्न असणार आहे.
वर्धा नदी ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. परंतु शेतकऱ्यांना या नदीच्या पाण्याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी शेती तोट्यात चालली आहे.
शेतकºयांचे जीवनमान उंचवायचे असेल तर सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी वर्धा नदीवर राजुरा ते वरोरापर्यंत ठिकठिकाणी पाच बॅरेज बांधण्याची नितांत गरज आहे. यामुळे शेतकºयांना थेट लाभ होईल. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील ८० टक्के उद्योग हे बंद पडलेले आहे.
यामुळे बेरोजगारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बेरोजगांचे प्रश्न सोडविण्यासाठी बंद पडलेले उद्योग कसे सुरू होतील, हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यात नवीन उद्योग कसे येतील, यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी नमूद केले.
संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी...
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी ही आपली मागणी नाही. दारुबंदीचा फायदा अन्य राज्यांना होत आहे. महाराष्ट्राला मिळणारा महसूल अन्य राज्याला मिळत आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑातच दारूबंदी केली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी, ही आपली मागणी नाही, या शब्दात खासदार सुरेश धानोरकर यांनी दारूबंदीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.