सुधीर मुनगंटीवार : मौलझरी तलावाच्या पुनरुज्जीवन मोहिमेला सुरुवात चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्रात पडलेल्या १९७२ च्या दुष्काळ काळात सुरु झालेल्या मौलझरी तलावाच्या अस्तित्वाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुर्नजीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. भुगर्भ तज्ञ्जांच्या सल्यानुसार या ठिकाणी पाणी साठवण केली जाणार असून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. २७ मार्च रोजी या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौलझरी तलाव धरणाच्या दुरूस्ती कामाचे भूमीपुजन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनोने आदी उपस्थित होते. मौलझरी तलावाच्या ठिकाणी भूमिपुजनाचा हा कार्यक्रम पार पडला. नागाळा येथे भूमिपुजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मौलझरी या तलावाखाली चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या ३ गावांचे ३९८ हेक्टर सिंचनक्षेत्र असून या गावांना सिंचनाकरिता हा तलाव बांधण्यात आलेला आहे. तथापि या तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाळीमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाझरामुळे तलावाव्दारे वरील गावांना आजपर्यंत सिंचन करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे या तीनही गावांचे मिळून जवळपास ५५० लाभधारक सिंचनापासून वंचीत आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाचे सचिव यांनीही ना. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या तलावास भेट दिली. त्यानंतर भुगर्भ वैज्ञानिक नागपूर यांनी पायव्यामध्ये कर्टन ग्राऊंटींगची उपाययोजना सुचविली. यासंदर्भात एक कोटी ५७ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून सोमवारी त्याचे भूमीपुजन करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरुज्जीवीत होईल व हे संपूर्ण क्षेत्र धानपिकाचे असल्याने कृषीमुल्याचे स्वरुपात राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनास लाखो रूपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) नळ जोडणीमार्फत होणार सिंचन मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळ जोडणी मार्फत सिंचन सुविधा पुरविण्यासाठी चांदा ते बांदा या विशेष कार्यक्रमांतर्गत २३.५० कोटी रू. निधी मंजूर करण्यात आले असून नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाचे ९०६ लाख ४४ हजार रूपये किमतीचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचन प्रकल्पांच्या पृूर्णत्वाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 1:57 AM