चंद्रपूर : प्रत्येक बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आरोग्य आणि पोषणाची नितांत गरज आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांना एकात्मिक दृ्ष्टीने मांडण्यात आले आहे. सोबतच धोरणात कौशल्याधिष्टीत शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शाळा पायाभूत सुविधांनी संपन्न व्हावी व प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा नव्या शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा गाभा आहे. विद्यार्थ्यांची क्षमता, आवड तसेच सोयीनुसार त्याला एकाचवेळी अनेक अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असल्याचे मत मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सिमतीचे राज्यस्तरीय सदस्य राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद मार्फत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रम कार्यान्वित केला जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सर्वांनी माहिती व्हावी यासाठी जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून शिक्षणतज्ज्ञ तसेच टाटा ट्रस्ट मुंबईचे व्यवसाय शिक्षण विभागााचे व्यवस्थापक किशोर दरक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य धनंजय चापले, यांच्यासह शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, पालक सहभागी झाले होेते.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ दरक यांनी नव्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण, पायाभूत सारक्षता व संख्याज्ञान, गळती कमी, सार्वत्रिक शिक्षण, अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्र, शाळा संकुल, संकल्पना आदींवर मार्गदर्शन केले. तर डायटचे प्राचार्य धनंजय चाफले यांनी नव्या शैक्षणिक धोरण सर्वांनी समजून घेत स्वीकारावे तसेच माणूस घडवण्याच्या प्रक्रीयेमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे ठरणार असून, नव्या धोरणानुसार आकृतीबंधातील पूर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षण एकसंघ दिसून येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक वरिष्ठ अधिव्याख्याता प्रल्हाद खुणे यांनी केले. संचालन विषय सहाय्यक कल्पना बन्सोड, आभार अधिवाख्याता विनोद लवांडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच विषय सहाय्यकांनी सहकार्य केले.