लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील वनव्याप्त परिसरातील तरुणांना रोजगार नाही. यासाठी तरुणांना स्वयंरोजगाराभिमुख वाहन चालक प्रशिक्षण देणे आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे प्रथम प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. सिंदेवाही येथे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, एक्सलन्स ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक गोदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, ब्राह्मणे, मध्यवर्ती कास्ट भंडारचे दुर्गेकर, तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विकास योजनेंतर्गत उपक्रम राबविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी वनविभाग व एक्सलन्स ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट छिंदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील २०० तरुण-तरुणींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात १६ कोलमाईन्स असून, त्या ठिकाणी हेवी व्हेईकल चालविणाऱ्या किमान दोन हजार ड्रायव्हरची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या कालावधीत २०० युवकांना जेसीबी ड्रायव्हिंग प्रशिक्षण, तसेच ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील युवकांना स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवावे.
रुग्णवाहिकेचे लोकार्पणड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून २०० युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण मिळाले आहे. जिल्ह्यात कोळशाच्या खाणी आहेत. त्या सुरू करण्याचे काम झाले, त्यासाठी मशिनरीसाठी ड्रायव्हरची आवश्यकता आहे. ती आवश्यकता लक्षात घेऊन पुढील प्रशिक्षण हेवी व्हेईकलचे राबवावे, अशा सूचना वनविभाग व ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटला केल्या. आमदार अभिजित वंजारी यांच्या स्थानिक आमदार निधीतून सिंदेवाही रुग्णालय याकरिता एक रुग्णवाहिका देण्यात आली. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.