भाविकांची गर्दी : हिंदू मुस्लीम ऐक्याचे चंद्रपुरातील प्रतिक चंद्रपूर : मोहरमच्या पार्श्वभूमीवर बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशाह वली र.त.अलेह यांच्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आज बुधवारी हजारोंच्या संख्येत भाविकांची गर्दी उसळली. चंद्रपूर येथील कारागृहात असलेल्या या दर्ग्याची ख्याती संपूर्ण विदर्भात असल्याने विदर्भातील भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. मुस्लिम बांधवांसोबत हिंदू बांधवांनी बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेत माथा टेकला. यावेळी भाविकांनी हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविले.विशेष म्हणजे, बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशाह वली र.त.अलेह यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर भाविक कारागृहातच असलेल्या विहिरीचे पवित्र जल प्राशन करतात. बाबांच्या दर्ग्याजवळ असलेल्या या विहिरीचे गोड पाणी अनेक आजार दूर करते, असे सांगितले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात मोहरम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवही हा सण साजरा करतात. मोहरम मासारंभापासून भाविक हा उत्सव साजरा करतात. येथील जिल्हा कारागृहात बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाहा उर्फ गैबीशाह वली र.त.अलेह यांचा दर्गा आहे. मोहरमच्या नवमी व दशमी या दोन दिवसांसाठी चंद्रपुरातील जिल्हा कारागृह भाविकांना दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी खुले केले जाते. आज बुधवारी दशमीनिमित्त येथील दर्ग्यावर भाविकांची गर्दी उसळली होती. सकाळपासून सुरू झालेली भाविकांनी रिघ दुपारनंतर पुन्हा वाढली. भाविक मोठ्या भक्तीने आपल्या मुलाबाळांसह येथे आले होते. प्रत्येक भाविक अगदी शांततेने दर्ग्यावर माथा टेकून पवित्र जल प्राशन करुन बाहेर पडत होता. दर्ग्याजवळ स्थित विहिरीचे पवित्र पाणी पिल्याने आजार बरा होत असल्याचे सांगण्यात येत असल्याने भाविक विहिरीचे पाणी पिऊन बॉटलमध्ये भरून नेतात. आजही अनेकांनी बॉटल भरून पाणी नेले. अनेकांनी बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवून शांतीचा आशिर्वाद मागितला. आज दिवसभर बाबांच्या दर्ग्यावर संदलची धूमधाम दिसून आली. भाविक हातात दर्ग्यावर चढविण्यासाठी चादर, नारळ, गुलाबांची फुले व पूजेचे साहित्य घेऊन वाजतगाजत दर्ग्याच्या दिशेने निघताना दिसून येत होते. कारागृहाच्या गेटवर व एकूण परिसरातच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कारागृहात जाण्यासाठी पटेल हॉयस्कूलजवळचा मार्ग खुला केला होता तर भाविकांना बाहेर पडण्यासाठी गिरनार चौकातील कारागृहाचा गेट उघडण्यात आला होता. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. महिला आणि पुरुष वेगवेगळ्या रांगेतून चालत बाबांच्या दर्ग्याकडे जात होते.दर्गा समितीचे मौलाना तुफैल अहमद साहब व सैय्यद लियाकत अली साहब यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की बाबांच्या दर्ग्याची ख्याती वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी भाविकांची गर्दीही वाढत आहे. कारागृहात असलेली दर्गा सुमारे चारशे वर्ष जुनी आहे. संपूर्ण विदर्भातून भाविक येथे येतात. सुमारे तीन लाख भाविक येथे येऊन दर्ग्याचे दर्शन घेतात, अशी माहितीही त्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)शहरात विविध ठिकाणी शरबतचे वितरणमोहरमनिमित्त शहरात आज विविध ठिकाणी सामाजिक संघटनांकडून शरबत व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संदल मिरवणूक ज्या मार्गावरून निघाली, त्या मार्गावर शरबत व महाप्रसाद वितरणाचे स्टॉल उभारण्यात आले होते. अनेक भाविकांनी शरबत व महाप्रसादाचा लाभ घेतला. कारागृह परिसरातही शरबताचे वितरण करण्यात आले. लोकप्रतिनिधींचेही दर्शनमोहरम हा सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा असल्याने अनेक राजकीय पुढाऱ्यांनी बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले. मंगळवारी मोहरमच्या नवमीनिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकून सर्वत्र शांतता नांदावी, असा आशिर्वाद मागितला. त्यानंतर आज बुधवारी भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनीही दर्ग्याचे दर्शन घेत पवित्र पाणी प्राशन केले.
मोहरमनिमित्त उघडतात कारागृहाची दारे
By admin | Published: October 13, 2016 2:22 AM