लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही यापुढे पत्नीच्या प्रसूतीसाठीही अभिवचन तसेच वंचित रजेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे बाप बनणाऱ्या कैद्याला मुलांच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहता येईल. राज्याच्या तुरुंग विभागाने जारी केलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) आणि अभिवचन रजेच्या (पॅरोल ) माध्यमातून काही दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१, तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते. विवाह मृत्यू अशाप्रसंगी ‘डीआयजी’च्या मंजुरीने दिल्या जातात, अभिवचन रजा मंजूर करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. ‘डेथ’ फर्लोच्या माध्यमातून १४ दिवसांची रजा मंजूर होते. याचे अधिकार कारागृह अधीक्षकांना आहेत. कैद्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यास तसेच त्याच्यामुळे इतरांना धोका असल्याचे मत झाल्यास रजा मंजूर होत नाही. सक्षम प्राधिकाराकडून रजेच्या अर्ज नामंजूर करण्यात आल्यास संबंधित कैदी उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. संचित आणि अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यास रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. राज्य शासनाने कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम १९५९ मध्ये सुधारणा केली आहे. १३ जुलै २०२१ रोजी याबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
खात्री पटली तरच पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी काही कागदोपत्री कारवाई करावी लागते. पती नसल्याने अडचण होते, हे लक्षात आल्याने राज्य सरकारने नियमांत सुधारणा केली. ‘आकस्मिक अभिवचन’ रजेवर सोडण्याचा अर्ज प्राधिकाऱ्याने नाकारल्यास कैद्याला पाच दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करता येणार आहे. विभागीय आयुक्तांची खात्री पटल्यास पाच दिवसांनंतरही अर्ज करता येणार आहे.