मूल : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोज आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आला. मात्र मूल येथील खासगी डाॅक्टर आणि कर्मचारी या लसीकरणापासून वंचित आहेत.
येथील खासगी डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन मूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग वाढत असताना मूल येथील खासगी डाॅक्टर प्रशासनासोबत काम केलेले आहे. गृह अलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांना नियमित भेट देऊन त्यांच्यावर उपचार करण्याचे काम येथील काही खासगी डाॅक्टरांनी केलेले आहे. त्यांच्यासोबतच पॅथालाॅजी तंत्रज्ञ आणि खासगी डाॅक्टरांचे कर्मचारी यांनीही काम केलेले आहे, शासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाच्या पहिल्या मोहिमेत सहभागी करण्यात येणार होते. मात्र मूल येथील खासगी डाॅक्टर, पॅथालाॅजिस्ट आणि आरोग्य कर्मचारी या कोरोना लसीकरणापासून वंचित आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे येथील डाॅक्टर, पॅथालाॅजिस्ट आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन मूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूल, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन मूलचे अध्यक्ष डाॅ. सुभाष रेड्डीवार, उपाध्यक्ष डाॅ. दिनेश वऱ्हाडे, सचिव डाॅ. विनोद चौधरी, डाॅ. आशिष कुलकर्णी, डाॅ. मार्टिन अझीम, सुकेश मुस्तीलवार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.