चंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रवासाची साधने कमी असल्याने ट्रॅव्हल्सधारक मनमानी भाडे वसूल करीत आहेत. चंद्रपूर ते औरंगाबादचे भाडे तर १७०० रुपये आकारत आहेत. मात्र पर्याय नसल्याने अतिरिक्त भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ट्रॅव्हल्स तर खचाखच भरून धावत आहेत. तसेच त्यांनी भाडेवाढसुद्धा केली आहे.
चंद्रपुरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, राजुरा आदी मार्गावर ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यातच कोरोनाने रेल्वेही अल्प प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. परिणामी ट्रॅव्हल्सची प्रत्येक फेरी खचाखच भरून धावते. तपासणीही होत नसल्याने वारेमाप शुल्क आकारले जात आहे.
ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी
प्रवाशांची हेडसांड होऊ नये वाहतूक विभागातर्फे व आरटीओतर्फे स्कूल बसेस, खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. तपासणीसाठी पोलिसांचे पथकही गठित केले आहे. तसेच निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.
ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही
ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक सीट भरल्या, तर आरटीओचे किंवा वाहतूक विभागाचे पथक कारवाई करीत होते. मात्र संप सुरू असल्याने पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे की काय, असे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. ते अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.
पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?
ट्रेनही बंद आहे. बससुद्धा नाही. परंतु, कामानिमित्त प्रवास करावाच लागतो. त्यामुळे इच्छा नसूनही, पर्याय नाही म्हणून अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.
- अमित दुधे, प्रवासी
चंद्रपूर ते गडचिरोली जाण्यासाठी बसने केवळ ९० रुपये लागायचे. परंतु, ट्रॅव्हल्सने १०० रुपये द्यावे लागतात. तेसुद्धा ट्रॅव्हल्स व्याहाडपर्यंत जात असते. पर्याय नसल्याने प्रवास करावाच लागतो.
- धम्मदीप बोरकर, प्रवासी