आधाराची गरज : तीन वर्षांची असतानाच वडिलांचेही झाले होते निधनमूल : प्रिया तीन वर्षांची असताना वडिलांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर वडिलांची उणिव भासू न देता आई निर्मलाने प्रियाला सांभाळले. मात्र नियतीला आईनेचे प्रेमदेखील मान्य नसावे. एक दिवस प्रियाला तिची आईदेखील कायमची सोडून गेली. आईच्या अकस्मात मृत्यूने प्रिया निराधार तर झाली. दु:ख सोसण्याची ताकद तिच्यात नसल्याने ती आज एकाकी पडली आहे.मूल नगरपरिषदेअंतर्गत वॉर्ड नं. १३ मधील रहिवाशी निर्मला अरुण गाडेवार ही ३८ वर्षीय महिला अंगणवाडीत मदतनिस म्हणून कार्यरत होत्या. निर्मलाचे पती अरुण मारोती गाडेवार हे यांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी ‘प्रिया’ तीन वर्षांची होती. बालपणातच वडिलाचे छत्र हरविल्याने निर्मलाने त्याची उणिव भासू न देता तिचे पालन पोषण करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिका क्षेत्रात शहरी अंगणवाडीमध्ये तिला मदतनिस म्हणून नोकरी मिळाल्याने तिला ‘आधार’ मिळाला. तिला अडीच हजार रुपयांचे मानधन मिळत असे. मात्र भाजपाप्रणित आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारने मदतनिसांचे मानधन अडीच हजार रुपयावरुन दीड हजार रुपये केले. त्यानंतर पुन्हा ५०० रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या घडीला एक हजार रुपये मानधन मिळत असल्याने आर्थिक संकटाशी सामना करणारी निर्मला खचून गेली. संसाराचा गाडा चालविण्यासाठी तुंटपुजे मानधन अपुरे पडत असल्याने ती मनोमन खचत गेली. प्रिया १८ वर्षांची असल्याने पुढील भविष्यातील लग्न व इतर संसाराला लागणाऱ्या बाबीची पुर्तता करण्यास ती असमर्थ ठरु लागल्याने ती खचून गेली. शासनाने अडीच हजार रुपयांवरून एक हजार रुपये मानधन केल्यामुळे निर्मलाची आर्थिक घडी विस्कटली. अनेक समस्यांशी सामना करीत ती येणारा दिवस मागे लोटत होती. आपल्या मुलीचे कसे होईल? या विंंवचनेने ती अंतर्बाह्य हादरून गेली. त्यातूनच तिला सावरता आले नाही. त्यात तिची प्रकृती ढासळली. आजारातच तिचे ३ जुलैला निधन झाले. वडिलानंतर आईचे निधन झाल्याने प्रियाला फार मोठा धक्का बसला आहे. प्रिया सध्या १२ वीला शिकत आहे. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने ती पोरकी झाली आहे. सध्या ती तिच्या ‘आत्या’च्या आधाराने राहत आहे. मात्र आई- वडिलांचे ‘प्रेम’ तिला मिळणार नाही. या जगात ती ‘एकाकी’ पडली आहे. (तालुका प्रतिनिधी)तीन वर्षांची असताना वडिलांचे निधन आणि आता आईदेखील प्रियाला कायमची सोडून गेली आहे. या परिस्थितीत तिला सावरण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सांत्वत करून ‘प्रिया’ला धीर देण्याचा प्रयत्न केला असला तरी तिला आईच्या ठिकाणी मदतनिस म्हणून नोकरी द्यावी, अशी मागणी आहे.
आईचे छत्र हरविल्याने ‘प्रिया’ झाली ‘निराधार’
By admin | Published: July 10, 2015 1:28 AM