अनेकश्वर मेश्राम।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीने गुणवत्ता गाठली. प्रियंका पंतुल भुक्या ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात अव्वल आली. शनिवारी विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रियंकाला तब्बल सहा सुवर्णपदक मिळाल्याने शहरातील शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. यामुळे बल्लारपूर येथील प्रियंका पंतुल भुक्या सुवर्ण कन्या ठरली.स्थानिक शिवनगर वॉर्डात पंतुल भुक्या यांचे कुटुंब राहते. पत्नी चंद्रावती, दोन मुली वृक्षता व प्रियंका, मुलगा शशीकुमार असे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. प्रियंकाच्या वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने सतत अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक मिळकत अल्प असतानाही प्रियंकाला शिक्षणात कमी पडू दिले नाही. मोठी बहिण वृक्षता हिनेही तिच्या शिक्षणात बराच हातभार लावला. बिकट परिस्थितीवर मात करुन प्रियंकाने यशाला गवसणी घातली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१७ च्या परीक्षेत एमएस्सी चवथ्या सत्राच्या रसायनशास्त्र विषयात यश संपादन करुन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. प्रियंकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट येथे झाले. त्यानंतर येथील गुरूनानक विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सीची पदवी घेतली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथूनही दुसरी आली होती. त्यानंतर एमएस्सी पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधून पूर्ण केले. विशेष म्हणजे राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एमएस्सी रसायनशास्त्र विषयाची गुणवत्ता यादी जाहीर केली असून यामध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नऊ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या आहेत. प्रियंका भुक्या हिला २५०० गुणांपैकी २०३३ गुण मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. यामध्ये यश मिळावयचे असेल तर अभ्यासाचे सातत्य आणि अवांतर विषयाचे वाचन या आदी कौशल्याची गरज आहे, असे मत प्रियंकाने ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहे.संशोधन पूर्ण करणारवेळेचे महत्त्व ओळखून अभ्यासाचे नियोजन केले. शिवाय, सकारात्मक विचार मनात कायम ठेवल्याने उच्च शिक्षणात चांगले यश मिळविणे शक्य झाले. बारावीनंतर एमबीबीएसला जावून डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र, ती संधी हुकली. त्यामुळे मन खचले होते. अपयशाला पचवूनच ध्येय गाठावे लागते. काळोखातच उद्याचा प्रकार दडला असतो. रसायनशास्त्र विषयात संशोधन करुन पीएचडी मिळविणार आहे, अशी माहिती प्रियंकाने ‘लोकमत‘ शी बोलताना दिली.
संकटांवर मात करून प्रियंका झाली सुवर्णकन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:07 PM
इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला.
ठळक मुद्देविद्यापीठात अव्वल : शहरातील शैक्षणिक वर्तुळात आनंद