ब्रम्हपुरी : नगर परिषद ब्रम्हपुरीद्वारा शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने विविध स्वच्छताविषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी नगर परिषदेच्या अध्यक्ष रिता दीपक उराडे तसेच आरोग्य सभापती सरिता माधव पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद सभागृहात पार पडला.
शहरातील स्वच्छता विषयक आयोजित विविध स्पर्धांमध्ये चित्रकला, जिंगल, शॉर्ट फिल्म, भित्तिचित्र, पथनाट्य व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा एकूण सहा स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला होता, चित्रकला स्पर्धेमध्ये मी कोविड योद्धा बोलतोय या विषयावर उर्वशी विवेक धोटे हिला प्रथम क्रमांक तर अवंती ननावरेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला,जिंगल स्पर्धेत रश्मी झोडेला प्रथम क्रमांक देण्यात आला,टाकाऊपासून टिकाऊ या स्पर्धा प्रकारात अद्याश्री शिंदेला प्रथम तर सलोनी हजारे हिला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला, भिंती चित्र या स्पर्धेत निखिल गोहाने माझी वसुंधरा विषयक पेंटिंग करिता प्रथम पारितोषिक तर पंकज देशमुख यास स्वच्छ भारत अभियान विषयक पेंटिंग करिता द्वितीय पारितोषिक तर उज्वल धोटे यास कोविड १९ विषयक पेंटिंगकरिता प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पथनाट्य या स्पर्धा प्रकारात से टू नो प्लास्टिक या विषयावर अर्थ लेंगुरे, पार्थ लेंगुरे,अर्जुन वंडलवार,तन्वी वंडलवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर एलएमबी स्कूलची रिद्धी शेंडे व त्यांच्या एकूण १२ जणांच्या चमुला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
यावेळी प्रशासन अधिकारी राहुल पिसाळकर, निरीक्षक राजेश चौधरी, स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी प्रितेश काटेखाये,,प्रकल्प अधिकारी धनंजय पोटे,विधी अधिकारी प्रमोद येरणे,नितेश रगडे उपस्थित होते.