कोरपना : संचारबंदीमुळे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाइलकडे पाहिले जाते. मात्र, रिचार्ज करूनही मोबाइलला कव्हरेज नसल्यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात शहरासारख्या ठिकाणी अजूनही कव्हरेजच्या अडचणी येत असल्याने, नागरिकांमध्ये रोष आहे, तसेच बाहेर जाता येत नसल्याने नातेवाईक तथा मित्रमंडळींना संपर्काचे एकमेव साधन म्हणून मोबाइलकडे पाहिले जाते. मात्र, विविध कंपन्यांच्या सिम कार्डला कव्हरेज नसल्याने ग्राहकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास ९० टक्के नागरिक फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामचा वापर करतात. चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइलचे वेड लागले आहे. मोबाइल आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनल्याने, नेटवर्क नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. जर महागडे रिचार्ज करूनही सिम कार्ड कंपन्या व्यवस्थित सुविधा देत नसेल, तर ही गोरगरीब ग्राहकांची फसवणूक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध मोबाइल कंपन्यांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांच्या समस्या सोडवाव्या, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.