फोटो
चंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ही कंपनी कोळसा उत्खननाचे कार्य करीत आहे. या प्रकल्पासाठी बरांज मोकासा व चेक बरांज या गावातील अनेकांची जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु अनेक वर्षांनंतरसुध्दा या प्रकल्पग्रस्तांना व खाणीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे हक्क मिळाले नाही. त्यासंदर्भात लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकल्पग्रस्तांचे व कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास सांगितले. ॲग्रीमेंटनुसार वेतन, नियुक्तीपत्र, पुनर्वसन, गावाच्या पोच मार्गावरून होणारी जड वाहतूक, प्रकल्पाच्या उरलेल्या ७० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण करणे, ग्रामपंचायतचे मागील सात वर्षाचे अंदाजे ३५ लाख रु. टॅक्सच्या रूपात वसूल करणे या विषयांवर आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना ताबडतोब निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यावर जिल्हाधिकारी यांनी हे सर्व मुद्दे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.