धाबा : गोंडपिपरी
तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग अतिक्रमणाने गिंळकृत झाला होता. गावात एखादयाचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी मोठी अडचण निर्माण व्हायची. त्यावेळी नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जायचा. गेल्या चाळीस वर्षापासून ही समस्या गावकऱ्यांना भेडसावत होती. दरम्यान पोचमल्लू उलेंदला यांनी सरपंचपदाचे सुत्र हाती घेताच अतिक्रमीत शेतकरी व प्रशासनाशी समन्वय साधून समस्या निकाली काढली. यामुळे तब्बल चाळीस वर्षापासून प्रंलबित असलेली समस्या सुटली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग अतिक्रमणामुळे गिळंकृत झाला होता. ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपूरावा केला. निवेदन दिली. पण काही एक फायदा झाला नाही. मार्गाच्या दोन्ही बाजूकडील शेतकरी मानण्यास तयार नसल्याने तब्बल चाळीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते पोचमल्लू उलेंदंला यांची सरपंचपदी निवड झाली. आपल्या पदाचा भार स्विकारताच त्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून असलेली समस्या सोडविण्याचा चंग बांधला. तहसिलदार के.डी.मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे यांची भेट घेऊन या समस्येबाबत चर्चा केली. गावातील स्मशानभूमीच्या मार्गावर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्या संपुर्ण शेतकऱ्यांशी त्यांनी समन्वय साधला. शेवटी स्मशानभुमीकडे जाणारा आठ मिटर मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती होती. भुमी अभिलेख विभागाचे कर्मचारी, सरपंच पोचमल्लू उलेंदला यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान या मार्गावर पक्क्या रस्त्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात हे काम सूरू होणार आहे.