सुधीर मुनगंटीवार यांची माहिती : वन उपजाचे ब्रांडिंग करणारचंद्रपूर : पाण्याचे महत्त्व ओळखून वन क्षेत्रातील वाहते पाणी तलावात किंवा मामा तलावात कसे सोडता येईल, यावर उपाययोजना कराव्या तसेच वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु व उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यावेळी उपस्थित होते.वनविभाग व वनक्षेत्र या विषयी जन माणसात रूची निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून गेल्या दहा महिन्यात वनविभागाने ३९ निर्णय केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वनाचे शोषण थांबावे असे सांगून ते म्हणाले की, वन विभागाने वृक्ष लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून १५ आॅगस्ट ला ३० हजार शाळांमध्ये वृक्ष लावले आहेत. लोकसहभागातून वनसंरक्षण करण्याचा प्रयत्न असून वनावर आधारित लोकांसाठी योजना आखल्याचे ते म्हणाले. जंगल हे वरदान असून वन उपजांचे ब्रांडिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र कार्यालय लोकांसाठी मदत केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.घोडाझरीचा वन पर्यटन म्हणून विकास करण्याची संकल्पना वन विभागाने मांडली असता, घोडाझरीचा उत्तम आराखडा तयार करा, निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. ब्रम्हपुरी वन विभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच वन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागभीड येथील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा कार्यक्रम राबवा
By admin | Published: September 20, 2015 1:33 AM