काळ्या मातीची ओढ स्वस्थ बसू देईना : गोवरी येथे उभारले डेअरी फॉर्म
प्रकाश काळे
गोवरी
: कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.टेकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करण्याची आवड व शेतीची ओढ त्याला नोकरीत स्वस्थ बसू देईना, अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडून शेतीसोबत दुग्ध व्यवसायात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी गाव गाठले. स्वतःच्या मेहनतीवर आणि दूरदृष्टीने या युवकाने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात इतरांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.
नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या उच्चविद्याविभूषित युवकांचे नाव ऋषिकेश लोनगाडगे आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवक आहे. बालपणापासून अभ्यासात तल्लख बुद्धिमत्ता होती. त्यामुळे बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे वळला. जळगाव येथे अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१३ -१४ मध्ये नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजमधून एमटेक (कॉम्प्युटर सायन्स) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि याच महाविद्यालयांमध्ये नोकरीला सुरुवात केली. नागपूरसारख्या महानगरांमधील प्रसिद्ध कॉलेजमधील नोकरीत मन मात्र रमले नाही. गावाकडील काळी माती त्याला वारंवार खुणावत होती. बालपणापासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची सुरुवातीपासून इच्छा होती. संगणक क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर शेवटी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले आणि पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे दूध पॅकेजिंगला सुरुवात केली. त्यानंतर मूळ गाव गोवरी येथे शेती असल्यामुळे गोपालन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रजातीतील गायी खरेदी करून गोवरी येथे डेअरी फार्मची निर्मिती केली.
बॉक्स
डेअरीत १५ गायी
आजघडीला १५ गायी डेअरी फार्ममध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रजातीच्या दूध देणाऱ्या गायी आहेत. दररोज साधारणपणे दीडशे लिटर गायीचे शुद्ध ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा उभी केलेली आहे. चंद्रपूर- बल्लारपूर, राजुरा शहरामध्ये सकाळीच गायीचे ताजे दूध घरपोच पोहोचवण्यात येते. यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो. गायीचे दूध काढताना यंत्राचा वापर केला जातो. गायीचे आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्यात येते. आहार व त्यांचे आरोग्य जोपासण्यासाठी तसेच दुधाचे वितरण करण्यासाठी गावातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या व्यवसायात ऋषिकेश लोनगाडगे याला पत्नी करिश्मा लोनगाडगे हिची मोलाची साथ आहे.
कोट
सुरुवातीपासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये नोकरी असतानासुद्धा माझे मन शेतीकडे होते. त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळलो. दूध पॅकेजिंगपासून आता स्वतःचा डेअरी फार्म निर्माण केलेला आहे.
दररोज जवळपास दीडशे लिटर दूध ग्राहकांपर्यंत पोओचविले जाते. ग्राहकाला शुद्ध आणि ताजे गायीचे दूध मिळावे हा उद्देश ठेवूनच व्यवसाय सुरू आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रसामग्री उपलब्ध आहे.
-ऋषिकेश लोनगाडगे, दुग्ध व्यावसायिक, गोवरी.