लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानेच समाजाची प्रगती शक्य आहे. आंबेडकरवादी समाजाला सत्ताप्राप्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी निष्ठा, इमानदारी आणि स्वाभिमान जागृत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील स्वाभिमान जागृत करून लक्ष्य गाठण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी केले.औरंगाबाद स्थित नागसेनवनातील मिलिंद कॉलेजच्या प्रांगणातून ४ आॅक्टोबरला श्रीपती ढोले व प्रा. विजयकुमार घोरपडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या ‘राजगृहाकडे चला’ या संदेश यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी चंद्रपुरात आगमन झाले. यावेळी गांधी चौकातील मनपा मैदानावर आयोजित जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. यावेळी श्रीपती ढोले, प्रा. विजयकुमार घोरपडे, मोरे, तेलगोटे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर, गोपाल देवगडे, लता साव, धीरज शेडमाके आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार रूजविण्यासाठीच ‘राजगृहाकडे चला’ ही संदेश यात्रा काढल्याचे सांगून या लक्ष्यप्राप्तीच्या अभियानात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष पेटकर यांनी आंबेडकर कुटुंबातील नेतृत्वानेच समाजाला दिशा दिल्याचे सांगून सत्ताप्राप्तीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहून डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी विविध संघटनांकडून आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात फुले-आंबेडकर विचार संवर्धन समिती, राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समिती, जमात इस्लामी हिंद, गोंडवाना विद्यार्थी संघटना, मादगी समाज सुधार मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
डॉ.आंबेडकरांच्या मार्गानेच प्रगती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:01 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानेच समाजाची प्रगती शक्य आहे. आंबेडकरवादी समाजाला सत्ताप्राप्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी निष्ठा, इमानदारी आणि स्वाभिमान जागृत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील स्वाभिमान जागृत करून लक्ष्य गाठण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी केले.
ठळक मुद्देआनंदराज आंबेडकर : ‘राजगृहाकडे चला’ संदेश यात्रेचे चंद्रपुरात स्वागत